पिंपळगाव हरेश्वर (प्रतिनिधी) वरखेडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत अज्ञात चोरट्याने बँक फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात निशांत मोहन कटके (वय ३५ रा. गणेश कॉलनी गो से हायस्कूलच्या पाठीमागे गणपती मंदिराजवळ पाचोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १२ जून २०२२ रोजी सकाळी ४ वाजेच्या सुमारास बँक ऑफ महाराष्ट्र वरखेडी शाखा, वरखेडी शाखेत कोणीतरी अज्ञात चोरट्याने ताब्यातील हातात असलेली लोखंडी कटावणी व त्याच्या ताब्यातील बजाज प्लेटिना कंपनीची मोटर सायकल (क्र. MH १९ BT १८०८) याच्यासह येवून बँकेच्या आवारात प्रवेश केला. तसेच बँकेत चोरी करण्याचा उद्देशाने बँकेचे लोखंडी चॅनल गेटचे कुलूप कटावणीने तोडण्याचा प्रयत्न करत असताना बरखेडी गावातील सागर चौधरी व योगेश चौधरी यांना दिसला. त्यामुळे त्या अज्ञात चोरट्याने मोटारसायकल व कटावणी जागेवर सोडून पळ काढला. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील हे करीत आहेत.