जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गांधी मार्केट परिसरात अल्पवयीन मुलाला पेट्रोल टाकून जिवंत जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडला.
शहरातील भिलपुरा भागात राहणार भिलपुरा भागात राहणारा १७ वर्षीय अल्पवयीन तरुण आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास आपल्या लहान भावाला शोधण्यासाठी गांधी मार्केट परिसरात गेला. यावेळी गांधी मार्केटमधील तिसऱ्या मजल्यावर अज्ञात चार ते पाच तरुण दारू पित होते. या तरुणाला पाहताच त्यांनी खिश्यातील १५ रूपये हिसकावून घेत मारहाण करण्यास सुरूवात केली. परंतू त्याने पळ काढण्याचा प्रयत्न करताच दारूड्यांनी त्याला पकडले आणि त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने अल्पवयीन तरुणाने दारूड्यांच्या हाताला जोरदार झटका देत तेथून पळ काढला. पिडीत मुलाने घरच्यांना आपबिती सांगितल्यानंतर कुटुंबियांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याबाबत चार ते पाच अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.