नांदेड (वृत्तसंस्था) लाचेची मागणी केल्याप्रकरणात फरार असलेला तामशाचा तलाठी रुपेश जाधव अखेर पोलिसांच्या जाळयात अडकला आहे. न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नांदेड शहरातील शाहूनगरमधील ‘मधु आस्था’ निवास येथे राहणारा तामशाचा तलाठी रुपेश जाधव याला दि.११ ऑगस्ट रोजी अखेर पकडण्यात आले. दि. ९ जून रोजी तामशाचा तलाठी देविदास जाधव याने तक्रारदाराच्या पत्नीस माहेरकडून मिळालेल्या शेत जमिनीचा फेरफार नोंद करुन सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी ७ हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती त्याने ६ हजार रुपये ‘फोन- पे’ वर घेण्याचा प्रयत्न केला.
याबाबत तामसा पोलिस ठाण्यात गुरनं ५७/२३ दाखल करण्यात आला. तेव्हापासून तलाठी रुपेश हा फरार होता. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे अधिकारी, कर्मचारी त्याच्या मागावरच होते. परंतु तो पोलिसांना गुंगारा देत होता. हदगाव तालुक्यातील जवळगावमध्ये तो लपून बसल्याची गुप्त माहिती पोलीस उपाधीक्षक राजेंद्र पाटील यांना मिळाल्यावर पोलीस निरीक्षक प्रीती जाधव, पोलीस अंमलदार संतोष वच्चेवार, बालाजी मेकाले व चालक नीळकंठ यमुनवाड यांनी सापळा रचून जवळगावमधून पळून जाताना हदगावच्या पेट्रोल पंपावर पकडले.
पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. त्याला तदर्थ सत्र न्यायाधीश- १ नांदेड यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. १५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने दिले आहे.