सोलापूर (वृत्तसंस्था) शहर पोलीस दलात भरती प्रक्रिया सध्या सुरु आहे. यावेळी एका तरूणाने स्वत:ची शारीरिक उंची वाढवण्यासाठी तोतयागिरी करण्याचा प्रयत्न केलाय. पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी उंचीची अट पूर्ण करण्यासाठी आरोपी प्रभुराम गुरव या उमदेवारानं विग लावला होता. पोलिसांनी या तरुणाला ओळखून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जेलरोड पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर शहर पोलीस दलासाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू होती. यासाठी २९ सप्टेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास शहर पोलीस मुख्यालयाच्या आवारात शारीरिक चाचणीचं आयोजन करण्यात आलं होतं. या मैदानी चाचणीसाठी आरोपी प्रभुराम गुरव देखील आला होता. पोलीस भरतीसाठी १६५ सेंटिमीटर उंचीची अट आहे. पण संबंधित आरोपी गुरव याची उंची काही सेंटिमीटर कमी होती. त्यामुळे त्याने स्वत:ची शारीरिक उंची वाढवण्यासाठी डोक्यावर चक्क विग घातला होता. उंची वाढवण्यासाठी तरुणाने केलेला प्रताप पाहून पोलीसही चक्रावले आहेत.
याप्रकरणी पोलीस हवालदार अंकुश ठोसर यांनी जेल रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस भरती प्रक्रियेत तोतयागिरी करणे, भरती प्रशासनाची फसवणूक करणे अशी विविध कलमाअंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.