देहरादून (वृत्तसंस्था) उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीनं धडक दिलीय. चमोली जिल्ह्याच्या नीती खोऱ्याच्या सुमनाच्या पुढे मोठ्या प्रमाणावर झालेल्या वर्फवृष्टीमुळे या भागात हिमस्खलन घडल्यानं अनेक रस्त्याचं काम करणारे अनेक मजूर इथं अडकून पडले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. जवानांनी आतापर्यंत ४३० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे.
भारतीय लष्कराचं अनेक तासांपासून बचावकार्य सुरु आहे. लष्कराच्या माहितीनुसार सुराई ठोसा येथून मलारी क्षेत्रापर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यावर हिमस्खलन झालं आहे. बचावकार्यादरम्यान आज सकाळी साडेसात वाजता दोन मृतदेह जवानांना सापडले. त्यानंतर ९ ते १० वाजेदरम्यान सहा मृतदेह सापडले. दुसरीकडे जखमींना तातडीने वायूसेनेच्या हेलिकॉप्टद्वारे जोशीमठे येथील सेनेच्या रुग्णालयात नेलं जात आहे. संबंधित दुर्घटना ज्या भागात घडली त्या भागात गेल्या चार-पाच दिवसांपासून लगातार मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्ते तुटले आहेत. घटनास्थळापासून अवघ्या काही ठिकाणावर जवानांचे कॅम्प आहेत. जवान रस्ते बनवायचं काम करत आहेत.
दुसरीकडे उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचंदेखील घटनास्थळाकडे पूर्ण लक्ष आहे. त्यांनी आज हेलिकॉप्टद्वारे घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सैन्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांना महत्त्वाची सूचनाही दिल्या.