मुंबई (वृत्तसंस्था) होळी हा हिंदू धर्मातील महत्वाचा सण मानला जातो. चैत्र महिन्यातील प्रतिपदेला होळीचा सण साजरा केला जातो. यावेळी होलिका दहन गुरुवार, १७ मार्च रोजी होणार आहे. १८ मार्च रोजी रंगांची होळी खेळली जाणार आहे. होलिका दहनासाठी लाकडाची खूप आधीपासून व्यवस्था केली जाते. परंतु धार्मिक मान्यतेनुसार काही झाडे अशी आहेत, जी हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानली जातात, या झाडांचे लाकूड होलिका दहनासाठी वापरू नये!
होळीच्या दिवशी घराच्या समोर होलिकादहन केलं जातं. हे दहन करताना शुभमुहूर्ताला फार महत्त्व आहे. असं मानलं जातं, की हिरण्यकश्यपूनं भगवान विष्णूचा भक्त असलेल्या बाळ प्रल्हादला होलिकेच्या मांडीवर बसवून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान होलिकेचा स्वतःच्याच आगीत जळून मृत्यू झाला होता. तेव्हापासून दर वर्षी फाल्गुन पौर्णिमेला होलिकादहन केलं जातं. वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. या वर्षी होलिकादहन 17 मार्च 2022 रोजी होणार असून, त्यानंतर 18 मार्च 2022 रोजी धूलिवंदन खेळलं जाणार आहे. होलिकादहनाची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. नाही तर जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावं लागू शकतं.
होळी पेटवताना ‘या’ चुका टाळाव्यात
होळी पेटवताना आंबा, पिंपळ आणि वडाचं लाकूड वापरू नये. या वृक्षांची लाकडं जाळल्यानं नकारात्मकता येते. त्याऐवजी होळीमध्ये उंबर आणि एरंडीचं लाकूड वापरावं. होळीच्या दिवशी या दोन्ही वृक्षांची लाकडं जाळणं शुभ मानलं जातं.
होळीच्या दिवशी न विसरता आपल्या आईचा आशीर्वाद घेतला पाहिजे. सोबतच आईला एखादी भेटवस्तूही देणंही चांगलं मानलं जातं. असं केल्यास तुमच्यावर भगवान श्रीकृष्णाची कृपा होते. होळीच्या दिवशी चुकूनही एखाद्या स्त्रीचा अपमान करू नये.
होळीतल्या आगीला जळत्या शरीराचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळं नवविवाहित महिलांनी ही आग पाहू नये, असं म्हणतात. एखाद्या नवविवाहितेने होळीची आग पाहणं अत्यंत अशुभ मानलं जातं. अशा महिलेनं होळीची आग पाहिल्यास तिच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात.
तुम्ही आई-वडिलांचं एकुलतं एक अपत्य असाल तर होळी पेटवू नका. एकुलत्या एक अपत्यानं होळी पेटवणं अशुभ मानलं जातं. तुम्हाला भावंडं असतील तर तुम्ही होळी पेटवू शकता.
होळीच्या दिवशी कुणालाही काही उसनं देऊ नये, असं म्हणतात. तसं केल्यास घरातली भरभराट जाते आणि आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे होळीच्या दिवशी कोणालाही उसनं किंवा कर्ज देण्याचं टाळावं.
होळीचा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. या वर्षी होळीची पूजा करताना वरील गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमची भरभराट होऊ शकते.