नागपूर (वृत्तसंस्था) इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेयो) एक संशयास्पद व्यक्ती बुरखा व त्यावर अॅप्रॉन घालून स्वतःला महिला डॉक्टर असल्याचे भासवून संशयास्पदरित्या फिरत होता. परंतू महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानाने पकडले असता ती महिला नसून पुरुष असल्याचे आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. जावेद शफी शेख (वय २५, रा. मोठा ताजबाग, दिघोरी), असे संशयिताचे नाव आहे. दरम्यान, पोलीस चौकशीत पुरुषांबद्दलच्या आकर्षणामुळे त्याने महिलेचा वेश धारण केल्याचे समोर आले. जावेदच्या मोबाईलमधील एका नंबरवर फोन लावल्यावर तर पोलिसांनाही हसू आवरले जात नव्हते.
नेमकं काय घडलं !
गेल्या पंधरा दिवसांपासून एक व्यक्ती बुरखा आणि त्यावर डॉक्टरचा अॅप्रॉन घालून फिरत होता. विशेष म्हणजे, बुरखा घातल्यानंतर तो स्वतः चेहराही झाकून घेत होता. मेयोतील एकही शिक्षण घेणारे डॉक्टर किंवा इतर कर्मचारी हे बुरखा घातल्यानंतर चेहरा झाकत नसल्यामुळे एमएसएफच्या जवानांना संशय येत होता. बुधवार, १४ जून रोजी सकाळी १०.३० ते ११ वाजताच्या सुमारास मेयोच्या सर्जिकल कॉम्प्लेक्सच्या मुख्य प्रवेशद्वारावर कर्तव्यावर असलेल्या एमएसएफ जवानाला बुरखा व त्यावर अॅप्रॉन घालून चेहरा झाकलेली महिला दिसली. त्यांनी तिला अडविले. सुरक्षारक्षकाने रुग्णालयाच्या आयकार्डबाबत विचारणा केली असता ती उत्तर देत नसल्याचे लक्षात येताच महिला सुरक्षारक्षकाला बोलाविण्यात आले.
बाईचा आवाज काढण्याचा प्रयत्नामुळे संशय बळावला !
बुरखा घातलेल्या व्यक्तीला बोलते करण्याचा प्रयत्न करीत असताना तिने बाईचा आवाज काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महिला सुरक्षारक्षकांचा संशय आणखीनच बळावला. त्यांनी तिचा बुरखा काढण्याचा प्रयत्न केला असता तिने नकार दिला. इतक्या मोठ्या लोकांसमोर बुरखा काढणार नसल्याचे तिने सांगितले. शेवटी महिला सुरक्षारक्षकाने तिला एका स्वतंत्र खोलीत नेऊन बुरखा काढण्यास सांगितले. तिने बुरखा काढताच आत दाढी-मिशी असलेला व्यक्ती दिसताच महिला सुरक्षारक्षक अवाक् झाली. त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव जावेद शफी शेख, असे सांगितले.
पुरुषांबद्दलच्या आकर्षणामुळे रिकामे उद्योग !
सुरक्षारक्षकांनी याची माहिती तहसील पोलिसांना दिली. पोलिसांनी मेयो गाठून त्याला ताब्यात घेतले. आरोपीचे लग्न झाले असून गेल्या काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी प्रकृती बरी नसल्याने मेयोमध्ये भरती होती. त्यावेळी तो नियमित तिला भेटण्यासाठी येत होता. तिची प्रकृती ठणठणीत होऊन तिला रुग्णालयातून सुटी झाली. त्यानंतर ती आरामाकरिता माहेरी गेली. अशा परिस्थितीत तो पत्नीचे कपडे घालून मेयोमध्ये फिरत होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला आहे. असे का करतो? असे विचारल्यावर त्याने पुरुषांबद्दलच्या आकर्षणामुळे रुग्णालयात फिरत असल्याचे आणि रुग्णांच्या पुरुष नातेवाइकांचे मोबाइल क्रमांक घेत असल्याचे सांगितले.
‘माय लव्ह’चा आवाज ऐकून पोलिसही हसले
सुरुवातीला जावेदच्या बोलण्यावर पोलिसांचा विश्वास बसला नाही. त्यामुळेच त्याचा मोबाईल तपासण्यात आला. मोबाईलमध्ये ‘माय लव्ह’ नावाने एक नंबर सेव्ह केलेला होता. फोन लावल्यावर पोलिसांना वाटले की समोरून एखादं महिलेचा आवाज येईल, मात्र समोरून एका पुरुषाचा आवाज आला. फोन घेणार्या व्यक्तीने सांगितले की, तो जावेदला महिला समजून त्याच्याशी प्रेमाने गप्पा मारत होता, हे ऐकून पोलिसांनाही हसू आवरले जात नव्हते. जावेदजवळ पोलिसांना 3 मोबाईल सापडले असून त्याने ते मोबाईल चोरल्याचा संशय आहे. तिन्ही क्रमांकांची चौकशी सुरू आहे.
महिला वापरतात असलेल्या वस्तू आढळल्या !
जावेदला पुरुषांचे आकर्षण आहे. याच कारणावरून तो रुग्णालयाच्या आवारात महिलेच्या रुपात फिरत होता. त्याची झडती घेतली असता, ज्या वस्तू महिला वापरतात त्याच्याकडे त्या वस्तू आढळून आल्या. पुरुषांबद्दलच्या आकर्षणामुळे आरोपीने महिलेचा पोशाख धारण केल्याची बाब तपासात समोर आली आहे.