मुंबई (वृत्तसंस्था) राज्याच्या जडणघडणीचा शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान मोठं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकापर्ण आज शनिवारी २३ जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. या समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती असणार आहे. राज्यातील महत्त्वाचे नेते आज दीर्घकाळानंतर एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.
बाळासाहेबांचे निकटचे स्नेही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असणार आहेत. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विशेष अतिथी असतील. या सोहळ्याला विशेष आतिथी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदी उपस्थित राहणार आहेत. महापौर किशोरी पेडणेकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. कोरोना संकटामुळे मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. मात्र, बाळासाहेबांच्या असंख्य चाहत्यांसाठी या सोहळ्याचे ऑनलाइन प्रेक्षपण केले जाणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हा मुंबईत उभारला जाणारा पहिलाच भव्य पुतळा असणार आहे. नऊ फूट उंच व १२०० किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती केलेली आहे. दोन फूट उंच हिरवळीसह सुमारे १४ फूट उंचीच्या चौथऱ्यावर हा पुतळा उभारण्यात आला आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकारला आहे. तसेच प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी केली गेली आहे. या सोहळ्याचे ऑनलाइन प्रेक्षपणही केले जाणार आहे.
मुंबईमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा असायला हवा, अशी मागणी करणारा प्रस्ताव आठ वर्षांपूर्वी पालिकेत शिवसेनेने मांडला होता. मात्र हा पुतळा शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात की, शिवाजी पार्क परिसरात उभारायचा यावरून शिवसेनेमध्येच मतभेत होते. या चर्चे दरम्यान जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा येथे पुतळा उभारण्याचे ठरवण्यात आले. मात्र हा प्रस्तावही पास होऊ शकला नाही. अखेर गेट वे ऑफ इंडिया येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इमारतीसमोर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटात हा पुतळा उभारला जाणार आहे. पालिका सभागृहात हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
नोव्हेंबर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचा सोहळा शिवाजी पार्कात घेण्यात आला. या सोहळ्याला देशभरातले प्रमुख नेते उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण होतं. राज ठाकरे यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर राज-उद्धव एका मंचावर आलेले नाहीत. आता जर बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरप्रसंगी राज ठाकरे उपस्थित राहिले तर उद्धव-राज जवळपास पंधरा महिन्यांनी एका मंचावर येतील.
















