मुंबई (वृत्तसंस्था) “येत्या गुरुवारी माझं अजून एक गाणं येत आहे त्यावरही ट्रोलिंग करा. सर्वांच स्वागत आहे, अमृता फडणवीस यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्या नवीन गाण्याची घोषणा केली. येत्या गुरुवारी अमृता यांचं गाणं येणार असून ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी हे गाणं प्रकाशित केलं जाऊ नये अशी मागणी करणारी ऑनलाइन याचिकाच चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटवर तयार करण्यात आली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येतात. काही दिवसांपूर्वीच ‘तिला जगू द्या’ या गाण्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. या गाण्याला त्यांना बऱ्याच टीकेचाही सामना करावा लागला होता. आता गुरुवारी (17 डिसेंबर) त्यांचं नवं गाणं प्रदर्शित होणार आहे. अशी माहिती खुद्द अमृता फडणवीस यांनी दिली आहे. ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यामुळेच अमृता यांच्या गाण्यासंदर्भातील बातमी समोर आल्यानंतर हे गाणं येण्याआधीच आता नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे काही तासांमध्ये ४०० हून अधिक जणांनी या ऑनलाइन याचिकेचं समर्थन केलं आहे. अमृता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये येत्या गुरुवारी मी गायलेलं एक गाणं प्रदर्शित होत असून हे गाणं एका सस्पेन्स चित्रपटातील आहे असं सांगितलं. तसेच हे येणारं नवीन गाणं हे प्रमोशनल साँग असून प्रत्यक्षात चित्रपटातही त्याचा वापर करण्यात आला आहे. हे गाणं एन्जॉय करा, ट्रोल करा पण नक्की पाहा असं आवाहनही अमृता यांनी केलं. मात्र हे गाणं प्रदर्शित होण्याआधीच अमृता यांना ट्रोलर्सने पुन्हा लक्ष्य केलं आहे.