नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रातील मोदी सरकारने (Central Govt) गव्हाच्या निर्यातीवर सशर्त बंदी (Conditional Ban On Wheat Exports) घातली आहे. देशांतर्गत बाजारात गव्हाच्या वाढत्या किमती पाहता सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र, काही अटींसह गव्हाची निर्यात सुरू राहील.
देशांतर्गत बाजारात गव्हाच्या वाढलेल्या किमतीमुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, काही अटींसह गव्हाची निर्यात सुरू ठेवण्यात येणार आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय आधीच करार झालेल्या निर्यातीसाठी लागू होणार नाही. सरकारने त्यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेत केंद्र सरकारने म्हटलं आहे भारत, शेजारी देश आणि इतर देशांमध्ये अन्न सुरक्षा धोक्यात आली आहे.
केंद्र सरकारने यासंदर्भात म्हटलं आहे की, देशाची एकूण अन्न सुरक्षेचं व्यवस्थापन करण्यासाठी आणि शेजारी तसेच इतर असुरक्षित देशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. भारत सरकार शेजारी आणि इतर असुरक्षित विकसनशील देशांच्या अन्न सुरक्षा गरजा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे, ज्यांचा जागतिक गहू बाजारातील अचानक बदलांमुळे विपरित परिणाम होतो आणि पुरेसा गव्हाचा पुरवठा होऊ शकत नाही.