जळगाव (प्रतिनिधी) शिरसोली येथे घराशेजारी निघालेल्या कोब्राला पकडत असताना, नागाने सर्पमित्राला दंश केला. मात्र, या दंशाने घाबरून न जाता सर्पमित्राने स्वतः दुचाकीवरून कोब्राला सोबत घेत दुचाकीने तब्बल १० किमीचा प्रवास करत जिल्हा रुग्णालय गाठले.
यासंदर्भात अधिक असे की, जळगाव येथील प्रजापत नगरातील रहिवासी सुधीर सपकाळे हा तीस वर्षीय तरुण सर्पमित्र आहे. तो भाऊबिजेनिमित्त शिरसोली येथे गेला होता. रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घराशेजारी साप निघाल्याने सर्पमित्राला बोलवा, असे शेजाऱ्यांनी सांगितल्यानंतर सुधीर याने आपणच सर्पमित्र असल्याचे सांगितले व काटेरी झुडपात असलेला कोब्रा पकडत असताना त्याच्या उजव्या पायाला कोब्राने दंश केला. यानंतर सुधीरने तो कोब्रा पकडून एका बरणीत ठेवला व तसाच स्वतः दुचाकी चालवत दहा किमी दूर जीएमसीत साडे अकराच्या सुमारास दाखल झाला. यावेळी राहुल पुडंलिक साळवे सोबत होता. डॉ. स्वप्निल कळसकर यांनी प्रक्रिया पूर्ण करून सुधीर सपकाळे याला अतिदक्षता विभागात दाखल केले.
दरम्यान, सुधीरला कोब्राचा दंश झाल्याने त्याला चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधार येणे, रक्ताच्या उलट्या झाल्याने त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कोब्राचे २० टक्के विष शरीरात गेले असून २४ तासांनंतर सुधीर धोक्याच्या बाहेर येऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या सुधीरच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत.