नागपूर (वृत्तसंस्था) फास्ट टॅगचा (Fastag) रिचार्ज गुगल पे वरून करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. रिचार्ज होताच त्या महिलेचे खाते हॅक करून तिच्या खात्यातून लाखो रुपये काढण्यात आल्याची तक्रार नागपूरच्या (Nagpur) सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. विशेष म्हणजे तक्रारदार महिला या नागपुर सत्र न्यायालयात न्यायाधीश असल्याची माहिती पुढे आली असून या प्रकरणात पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिव्हिल लाईन्स येथील रहिवासी सोनाली मुकुंद कनकदंडे यांनी 14 मे रोजी दुपारी 4 वाजता गुगल पे वरून फास्टॅग कार्ड 500 रुपयांचे रिचार्ज केले. त्यानंतर त्यांनी नेट बँकिंगद्वारे त्यांची काही खाती तपासली. त्यानंतर त्यांना खात्यांमधून व्यवहार झाल्याचे लक्षात आले. अज्ञाताने त्यांच्या विविध खात्यांमधून 2 लाख 75 हजार 399 रुपये इतर खात्यात ट्रान्सफर केले. हे लक्षात येताच त्यांनी संबंधित बँकांच्या कस्टमर केअरला फोन केला. त्यानंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले. अद्याप आरोपींबाबत कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही. सायबर टीमच्या मदतीने या प्रकरणाचा छडा लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.