यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील सातोद येथे वीज कर्मचारी वीजबिलाच्या थकबाकी वसुलीसाठी गेले असता त्याचा राग येऊन पिता पुत्राने या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील सातोद येथील सुनील भास्कर धांडे यांच्याकडे थकीत वीजबिल वसुलीसाठी येथील महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ योगेश प्रल्हाद बारी, गिरीश सतीश चौधरी हे गेले होते. त्यांना बिल भरण्यास सांगितले असता त्याचा राग येऊन सुनील धांडे व योगेश सुनील धांडे या दोघांनी महावितरण कर्मचाऱ्यांना शिविगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. योगेश बारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे हे पुढील तपास करीत आहेत.