जळगाव (प्रतिनिधी) शहरातील जोशी पेठ भागातील ‘श्री बालाजी ज्वेलर्स’ या दुकानातून सुमारे ३१ लाख ६९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन एक कारागीर फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी टोटन बलराम बाहेती (५१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात ३१ डिसेंबर रोजी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी बाहेती हे गेल्या ३० वर्षांपासून सोन्याचे दागिने बनवण्याचे काम करतात. ४-५ वर्षांपासून ओळखीचे असलेले तापस रूपचंद मन्ना यांनी आपला चुलत भाऊ असित गंगाबाला मन्ना (रा. बंशकल, पश्चिम बंगाल) हा इमानदार असल्याची गॅरंटी दिली होती. त्याच्या शब्दावर
विश्वास ठेवून बाहेती यांनी असितला आपल्या दुकानात कारागीर म्हणून कामावर ठेवले होते. गेली ३-४ वर्षे त्याने मालकाचा विश्वास संपादन केला होता.
डोळ्या तपासण्यास जातो म्हणत झाला पसार
२ डिसेंबर २०२५ रोजी ‘मल्हार ज्वेलर्स’ कडून आलेल्या मंगळपोतच्या ऑर्डरसाठी बाहेती यांनी असितला २९७. १०० ग्रॅम वजनाचे २० कॅरेट सोने दिले होते. ५ डिसेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास, ‘डोळे तपासायला डॉ. गुजराती यांच्याकडे जातो’ असे सांगून असित दुकानातून बाहेर पडला. दुपारी १ वाजेपर्यंत त्याने फोनवर चष्मा बनवायला दिला आहे, येतो अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, ४ वाजेनंतर त्याचा फोन बंद झाला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी कैद
बाहेती यांनी संशयावरून डॉक्टरांच्या दवाखान्यात चौकशी केली असता, दवाखाना ४ ते ७ डिसेंबर दरम्यान बंद असल्याचे समजले. त्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, ४ डिसेंबरच्या रात्री १०:११ वाजता असित एका रुमालात सोने गुंडाळून दुकानातून बाहेर पडताना स्पष्टपणे दिसून आला. बाहेती यांनी असितचा भाऊ तापस मन्ना याच्याकडे चौकशी केली असता त्यानेही उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बाहेती यांनी शनिपेठ पोलीस गाठले. असित गंगाबाला मन्ना आणि तापस रूपचंद मन्ना या दोघांनी संगनमताने विश्वास संपादन करून ३१ लाख ६९ हजार ४१२ रुपयांचे सोने चोरून नेल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत
















