धरणगाव (प्रतिनिधी) येथील गौतम नगरमध्ये राहणाऱ्या भाजी विक्रेत्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ग्रामीण रुग्णालयात घडली. धुडकाबाई नथ्थू विसावे (वय ७५), असे मयत महिलेचे नाव आहे.
येथील गौतम नगरमध्ये राहणाऱ्या भाजी विक्रेत्या महिला धुडकाबाई ह्या गुरुवारच्या बाजारात कोट बाजारात भाजी विक्री करत होत्या. २३ रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास अचानक उष्णतेमुळे धुडकाबाई विसावे या चक्कर येऊन पडल्या. त्यानंतर त्यांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथे डॉ. जितेंद्र चव्हाण यांनी त्यांच्यावर उपचार केलेत. मात्र, उष्णतेमुळे त्यांची अधिकच प्रकृती खालावली अन् उपचार सुरु असतानाच धुडकाबाई विसावे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, धुडकाबाई विसावे या ४० वर्षापासून कोट बाजारात भाजी विक्रीचे काम करत होत्या. धरणगाव ग्रामीण रुग्णालयात मे हिट सुरु असला तरी उष्माघात कक्षच सुरु करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.