भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत दरोडा टाकत गहाण ठेवलेले साधारण ३ कोटीचे सोने चोरल्याची घटना उघडकीस आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. परंतू, पोलिसांनी अवघ्या तीन तासात तिघं चोरट्यांना अटक केलीय.
या संदर्भात अधिक असे की,तालुक्यातील आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून ३ कोटीचे सोने लुटून नेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपासचक्र फिरवायला सुरुवात केली होती. त्यानुसार अवघ्या ३ तासातच आरोपीसह मुद्देमाल हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, आरोपीत बॅकेच्या शिपाई आणि गावातील ३ जणांना समावेश असल्याची प्राथमिक माहीती समोर येत आहे. या जबरी चोरीचा पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या तीन तासात बँक कर्मचारी व त्याच्या दोन साथीदार यांना ताब्यात घेत या जबरी चोरीचा पर्दाफाश केला. घटनास्थळी नुकतीच पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी भेट दिली आहे.
भडगाव तालुक्यातील आमडदे येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत दि. २२ नोहेबर रोजी रात्री १ ते २-३० वाजेच्या दरम्यान चोरी झाल्याची माहिती गावात पसरली. पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर चोरांनी बँकेचे कुलुप तोडणे, तिजोरी फोडणे, लॉकर तोडणे असा कोणताही प्रकार केलेला नव्हता. तसेच बँकेत असलेल्या रोकड देखील सुरक्षित होती. यामुळे बँकेतीलच कर्मचार्यांचा या चोरीत सहभाग असावा असा, संशय पोलिसांना आला. त्यानुसार तपासचक्र फिरवीत तीन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. दरम्यान, तिघे आरोपीपैकी एकाने आमडदे शेत शिवारातील जोगडाकडील शेतात व आंचळगाव रस्त्याकडील शेतात खड्डा करुन लपविलेले दागिणे काढुन दिल्याचे देखील कळतेय.