मुंबई (वृत्तसंस्था) भांडुपच्या ड्रीम्स मॉलमधील कोविड सेंटरमध्ये लागलेल्या आगीच्या घटनास्थळी जाऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. फडणवीस म्हणाले, “जी घटना घडली आहे त्यामध्ये सरकारचं बीएमसीचं अक्षम्य दुर्लक्ष व ढिसाळपणा हा स्पष्टपणे दिसतो आहे. या संदर्भात आता काही फार बोलणं योग्य होणार नाही, कारण आता लोकं दुःखात आहेत. पण मला हे समजत नाही की आणखी किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर या सरकारला जाग येणार आहे.
भांडुपमधील ड्रीम्स मॉल सनराइज रुग्णालयात लागलेल्या आगीत एकूण १० जणांचा मृत्यू झाला. या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेत, घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. तसेच, त्यांनी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसाठी मदत केली जाईल असं आश्वासन देखील दिलं. तर, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर आला असून ही अत्यंत गंभीर घटना असल्याचं सांगत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळास भेट दिल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना, राज्य सरकारवर टीका केली व घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली.
फडणवीस म्हणाले, “जी घटना घडली आहे त्यामध्ये सरकारचं बीएमसीचं अक्षम्य दुर्लक्ष व ढिसाळपणा हा स्पष्टपणे दिसतो आहे. या संदर्भात आता काही फार बोलणं योग्य होणार नाही, कारण आता लोकं दुःखात आहेत. पण मला हे समजत नाही की आणखी किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर या सरकारला जाग येणार आहे. मला असं वाटतं या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे आणि अशा घटना घडणार नाही, यासाठी घोषणा नाही तर प्रत्यक्ष कार्यवाही ही सरकारच्यावतीने झाली पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे.” भंडाऱ्यात नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात आरोग्य केंद्र, हॉस्पिटलमध्ये फायर ऑडीटचे आदेश दिलेले. मग इथे फायर ऑडीट का झाले नाही? या इमारतीला ओसी नसताना इथे कोविड सेंटर सुरूच कसे करण्यात आले, असा सवालही फडणवीसांनी विचारला आहे.
या इमारतीतून बचाव करण्यासाठी रेस्क्यूचा पर्यायही धड नव्हता. त्यामुळे रुग्णांनाही स्वत:चा जीव वाचवता आला नाही, तसेच अग्निशमन दलालाही बचावकार्यात अडथळे आले. त्यामुळे एकंदरीतच याला मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिका जबाबदार आहे. आगीप्रकरणी सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष आहे. मुंबई महापालिका भ्रष्टाचाराने पोखरून गेली आहे, त्यामुळे न्यायालयानेच सुओ मोटो घेऊन याप्रकरणात लक्ष घालावे, अशी विनंतीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.