एरंडोल (प्रतिनिधी) पारोळ्याकडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत जळू येथील दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना राखी पौर्णिमेच्या दिवशीच घडली. यामुळे जिल्ह्यात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
यासंदर्भात अधिक असे की, एरंडोल तालुक्यातील जळू येथील युवक इंद्रसिंग दगडू पाटील (वय २८) आणि भूषण कौतिक पाटील (वय २२) हे दोन युवक रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास एरंडोलकडून मोटर सायकल (क्र. एमएच. २०, एफक्यू ७५०५) ने घरी येत होते. राष्ट्रीय महामार्गावरील भालगाव फाट्याजवळ असलेल्या शहा पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या मोटर सायकलला पारोळ्याकडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक (क्र. एमएच १९, झेड. ४५२७) ने समोरून जोरदार धडक दिली. यात मोटरसायकलवरील दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक जागेवर सोडून फरार झाला. अपघातानंतर पंपावरील कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, उपनिरीक्षक अविनाश दहिफळे, पोलीस कर्मचारी अकिल मुजावर, संदीप सातपुते, अनिल पाटील यांचेसह पोलीस कर्मचारी तसेच पातरखेडे येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली.
अपघातात मयत झालेला भूषण औरंगाबाद येथे कंपनीत नोकरीस होता. त्याच्या पच्छात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. तर इंद्रसिंग पाटील याच्या पच्छात आई, भाऊ, पत्नी व तीन वर्ष वयाचा मुलगा आणि एक वर्ष वयाची मुलगी असा परिवार आहे.