जळगाव (प्रतिनिधी) पुण्यातील भोसरी भूखंड प्रकरणात मंदाकिनी खडसे यांची कोठडी ईडीने मागितली होती. त्यावर ईडीला चौकशी करायची असल्यास २४ तासांपूर्वी कल्पना देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच अटकपूर्व जामीनावर 21 तारखेला सुनावणी होणार आहे. या निमित्ताने मंदाकिनी खडसे यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.
दर शुक्रवारी ईडी कार्यालयात हजेरी लावण्याबाबतचे आदेश न्यायालयाने मागे घेतले आहेत. त्यानुसार पुढील सुनावणी २१ डिसेंबर रोजी असून तोपर्यंत अटकेपासून देखील खडसे यांना दिलासा देण्यात आलाय. खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांच्या जामीन अर्जावरही आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याबाबत कोर्टाने स्पष्टीकरण दिलं आहे.
ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणात ही चौकशी सुरू केली होती. खडसे महसूल मंत्री असताना त्यांच्या जावयाविरोधात भूखंड प्रकरणात काही पुरावे हाती लागले होते. आणखी एका प्रकरणात खडसेंच्या पत्नी मंदाकिनी यांचाही सहभाग असल्याचं समोर आलं होतं. यावर मुंबई उच्च न्यायालयाने पत्नी मंदाकिनी खडसे यांना दिलेले अंतरिम संरक्षण २१ डिसेंबरपर्यंत वाढवले आहे. मंदाकिनी यांचा ताबा द्यावा अशी मागणी होत असतानाच त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २१ डिसेंबरला पुढील सुनावणी होणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.