जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरचा डेक्कनच्या गुन्ह्यातील नियमित जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे.
मुख्य संशयित सुनील झंवरने हायकोर्टात नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. विशेष सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण यांनी सुनील झंवरच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला. अॅड.चव्हाण यांनी याआधी खालील कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले होते की, गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे. याचसोबत त्यांनी गुन्ह्याची संपूर्ण पार्श्वभूमी देखील सांगितली. तसेच पोलिस तपासात सुनील झंवर याने अनुप कुलकर्णी तसेच उमाळे नामक दोन साक्षीदारांना धमकाविले होते. या दोघांवर सुनील झंवरने दबाव टाकत सांगितले होते की, तुम्ही पोलिसांना माझ्या बाजूने जबाब द्या किंवा जबाब देण्यास जाऊच नका,असे म्हटले होते. हा मुद्दा देखील अॅड.प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला होता.
बीएचआर घोटाळ्याचा झंवर हाच मुख्य सूत्रधार आहे. तसेच तो फरारी असतानाही साक्षीदारांना संपर्क करून दबाव टाकलेला आहे. घुले रोड येथील जागेवर जोराने बँकेकडून कर्ज घेतले आहे, असे अनेक प्रभावी मुद्दे प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयात मांडले होते. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई हायकोर्टाने झंवरचा जामीन आज अर्ज फेटाळून लावला.दुसरीकडे शिक्रापूरच्या गुन्ह्यात मात्र, झंवरला अंतरिम जामीन मंजूर झालेला आहे. दरम्यान, सुनील झंवरचा जामीन अर्ज फेटाळल्याच्या वृत्ताला विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे.
आतापर्यंत चार दोषारोप पत्र दाखल
पुणे आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंतच्या तपासात संकलित पुरावे तसेच चौकशी अंती आज २३ फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर पुणे येथील न्यायालयात सुजीत वाणी, धरम साखला, महावीर जैन, विवेक ठाकर, कमलाकर कोळी यांच्या विरोधात २ हजार ४०० पानांचे पहिले दोषारोप पत्र दाखल केले आहे. त्यानंतर मार्च महिन्यात सुरज झंवर याच्या विरोधात दुसरे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. ऑक्टोंबर महिन्यात जितेंद्र कंडारे विरोधात तिसरे तर २८ नोव्हेंबर रोजी सुनील झंवर याच्याविरोधात चौथे दोषारोपपत्र पुणे न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
















