जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने महिनाभरापूर्वी पावत्या मॅचिंग करून कर्जफेड करणाऱ्या ११ बड्या हस्तींना राज्याच्या विविध भागातून अटक केली होती. अटकसत्राच्या पुढील टप्प्यात आता अशाच पद्धतीने पावत्या मॅचिंग करणारे ६६५ बडे कर्जदारांपैकी अनेक जण रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ‘चक्की पिसिंग’च्या बाबतीत आता पुढील नंबर कुणाचा लागेल?, याबाबत जळगाव जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, मुख्य सूत्रधार तथा अवसायक जितेंद्र कंडारेला अटक झाल्यानंतर तपासाला प्रचंड वेग आला असून अनेक महत्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळाली आहे.
पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राज्यभर अटकसत्र राबविले. बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात जून महिन्यात ११ जणांना अटक केली होती. त्यात भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री शैलेश मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), प्रीतेश चंपालाल जैन (धुळे), अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई) आणि प्रेम नारायण कोगटा (जळगाव) यांचा समावेश होता. अटक करण्यात आलेल्या या लोकांमध्ये बहुतांश राजकीय आणि व्यावसायिकदृष्ट्या राज्यातील मोठी नावे आहेत. अटकेतील संशयितांनी एजंट नामे अनिल पगारीया, संतोष बाफना, अजय ललवाणी, उदयकुमार कांकरीया, रमेश जैन, अजय जैन, अशोक रूणवाल, शिरीष कुवाड, अतुल गांधी व वसंत चव्हाण यांची नावे सांगितली होती.
पहिल्या अटक सत्रात अनेक दिग्गजांना अटक केल्यानंतर राज्यातील इतर १८ जिल्ह्यांतील बडे कर्जदार, कमी किमतीत जागा खरेदी करणारे व सेटलमेंट करणाऱ्या एजंट आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आले आहेत. अवसायक जितेंद्र कंडारेचा एक पंटर लहान कर्जदारांना न्यायालयीन कारवाई व संस्थेकडून जप्तीच्या कारवाईचा धाक दाखवून या थकीत कर्जदारांकडून लाखो रुपयांची वसुली करीत होता. तसेच ३० टक्क्यात पावत्या मॅचिंग करायला भाग पाडत होता. त्यामुळे असे सगळे पंटर, एजंट आणि पावत्या मॅचिंग करणारे ६६५ बडे कर्जदार रडारवर आले आहेत. दरम्यान, बीएचआरमध्ये मोठया प्रमाणावर आर्थिक अपहार व गैरव्यवहार हा संगनमताने व पूर्व नियोजित कटाने झालेला आहे. त्यामुळे पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक अगदी टप्प्या टप्प्याने कारवाईची फास आवळत आहे.