जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळा (Bhr Scam) प्रकरणात जामीन मिळवून देण्यास सहकार्य करण्याचे आश्वासन देत १ कोटी २२ लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी तत्कालीन माजी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavhan),विशेष लेखापरीक्षक शेखर सोनाळकर (रा. जळगाव) आणि चाळीसगावचे मद्यव्यापारी उदय नानाभाऊ पवार (रा. चाळीसगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर चाळीसगावच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. कारण उदय पवार हे चाळीसगाव भाजपातील एका बड्या नेत्याचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.
बीएचआर घोटाळ्यात नुकतीच एक नाट्यमय घडामोड घडली आहे. सुरज झंवर (Suraj Zavar) यांनी डेक्कन पोलिसात फिर्याद देत विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण,विशेष लेखापरीक्षक शेखर सोनाळकर (रा. जळगाव) आणि चाळीसगावचे मद्यव्यापारी उदय नानाभाऊ पवार (रा. चाळीसगाव) यांच्याविरुद्ध अनेक गंभीर आरोप केले आहेत. प्रवीण चव्हाण यांच्यासाठी १ कोटी २० लाख रुपये खंडणी उकळत स्वतः कमिशन म्हणून अतिरिक्त २ लाख स्वतः घेतल्याचा पवार यांच्यावर आरोप आहे. उदय पवार आणि अॅड. प्रवीण चव्हाण हे दोघं चाळीसगाव तालुक्यातील रहिवाशी आहेत. दोघांचे कौटुंबिक व जिव्हाळयाचे संबध असल्याचा आरोप सुरज झंवर यांनी फिर्यादीत केला आहे.
दुसरीकडे उदय पवार यांचे भाजपमधील एका बड्या नेत्याशी देखील घनिष्ट संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळेच मध्यंतरीच्या काळात आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavhan) यांना बीएचआर घोटाळ्यात अडकवण्यासाठी एका स्थानिक भाजपच्या नेत्याच्या सांगण्यावरून प्रयत्न झाले होते, अशी जोरदार चर्चा तालुक्यात सुरु आहे. मंगेश चव्हाण यांच्यासह त्यांच्या परिवारातील सदस्यांना बीएचआर घोटाळ्यात अडकवण्याची खेळी चाळीसगाव तालुक्यातून खेळली गेली होती. एवढेच नव्हे तर, आ. चव्हाण यांना बीएचआर घोटाळ्यात अडकवण्यासाठी कथित कागदपत्र देण्यासाठी मोठ्या घडामोडी देखील घडल्या होत्या.
थोडक्यात मंगेश चव्हाण यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आणून आपल्यासाठी विधानसभेचे मैदान मोकळे करण्याचा या स्थानिक नेत्याने डाव रचला होता, असे देखील बोलले जात होते. परंतू प्रवीण चव्हाण यांचे स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्येच खळबळ उडवून दिली होती. यामुळे परंतू मंगेश चव्हाण यांना अडकवण्याचे षड्यंत्र यशस्वी झाले नव्हेत. परंतू आता बीएचआर प्रकरणात नव्याने गुन्हा दाखल झाल्याने चाळीसगाव तालुक्यातील राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. तर याचे तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात दूरगामी परिणाम होणार असून षड्यंत्र रचणाऱ्या नेत्याचेच आगामी काळात तिकीट कापले जाणार असल्याची देखील चर्चा सुरु आहे.