जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) अवसायिक जितेंद्र कंडारे, उद्योगपती सुनील झंवर यांच्यासह इतर संशयितांचा पाय अधिक खोलात जातांना दिसत आहे. ‘बीएचआर’च्या करोडोच्या मालमत्ता कवडीमोल भावात खरेदी केलेल्या सर्व संशयितांच्या मालमत्तेचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. तशातच सुनील झंवर यांच्या मालमत्तांची माहिती घेण्यास सुरुवात झाली असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या आयुक्त भाग्यश्री नवलखे यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलताना सांगितले. त्यामुळे झंवर यांच्यासह लवकरच सर्व संशयितांची मालमत्ता सील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, साधारण १ हजार कोटीची मालमत्ता अवघ्या काही ठराविक लोकांनी खरेदी केल्याचा संशय आहे.
भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेवर नियुक्त प्रशासक जितेंद्र कंडारे यांनी ८ नोव्हेंबर २०१५ रोजी जळगाव एमआयडीसीतील पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाचे कुलूप तोडून ताबा घेतला होता. त्यानंतर बीएचआर या अवसायानात असलेल्या सोसायटी विरोधात व अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या साशंक कारभाराच्या विरोधात १९ जुलै २०१९ रोजी महाराष्ट्र व्यापी ‘धडकी भरो छत्री’ आंदोलन करण्यात आले होते. जितेंद्र कंडारे हे साशंक पद्धतीने काम करत असल्याने आम्हाला ठेवी परत मिळत नसल्याचा आरोप ठेवीदारांनी केला होता. त्यावेळी ठेवीदारांनाकडून याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या की, जितेंद्र कंडारे हे कर्जदारा सोबत मिलीभगत करून ठेवीदारांना ठेवी परत करताना ठेवीच्या मूळ रकमेच्या केवळ ३० टक्के परत देतात आणि ठेवीदारांकडून ठेवीची १०० टक्के रक्कम प्राप्त झाल्याचे लिहून घेतात. तसेच ठेवीची पावती कर्जदाराला हस्तांतरित करून कर्ज रकमेतून वरती केल्याचे कागदोपत्री दर्शविले जात होते.
अगदी कर्ज नील झाल्याचे सर्टिफिकेट कर्जदाराला देखील दिले जात होते. मात्र, त्याच्या खात्यात तशी नोंद होत नव्हती. या व्यवहारात ठेवीदारांना ठेवीची दिलेली ३० टक्के रक्कम वगळून उरलेली ७० टक्के रकमेतील ३० ते ४० टक्के रक्कम श्री.खंडारे यांना कमिशन म्हणून रोख स्वरूपात मिळत असल्याचा आरोप होत होता. ही रक्कम बेहिशोबी असल्याने तिची नोंद कागदोपत्री कुठेही आढळत नाही. यातून श्री.कंडारे यांनी स्वतःची पत्नी आई-वडील मेहुना तसेच औरंगाबाद येथील जमीन खरेदी विक्री व्यवसाय करणारा भाऊच्या आणि जळगाव येथील दुकान व जागा खरेदी विक्री करणाऱ्या भावाच्या नावे अनेक ठिकाणी गुंतवणूक केली असल्याचे समजते.
याच पद्धतीने सुनील झंवर यांनी ‘बीएचआर’ सर्वात जास्त मालमत्ता खरेदी केली असल्याचे कळते. पोलिसांनी २०१५ नंतर झंवर यांनी पाळधी, नाशिक, मुंबई, पुणेसह इतर राज्यात खरेदी केलेल्या मालमत्ता आपल्या रडारवर घेतल्या आहेत. तसेच यात अवसायक कंडारे आणि झंवर यांचे काही आर्थिक व्यवहार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष झाले आहेत का? याची देखील माहिती पोलीस घेत आहेत. दरम्यान, सुनील झंवर यांच्या मालमत्तांची माहिती घेण्यास सुरुवात झाली असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या आयुक्त भाग्यश्री नवलखे यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलताना सांगितले. त्यामुळे झंवर यांची मालमत्ता सील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे आज सायंकाळपर्यंत तपासणी सुरूच राहणार असल्याचे कळते.