जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सुनील झंवर याने टेंडरमधील मालमत्ता कोणाच्या सांगण्यावरून व कोणाकरिता खरेदी केली?. तसेच याकरिता आवश्यक असलेला पैसा कसा उपलब्ध केला?, यासह तब्बल १० महत्वपूर्ण कारणं आज आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस कोठडी मिळण्यासाठी न्यायालयासमोर ठेवली होती.
पोलिस कोठडी मिळण्यासाठीची कारणे
१) सुनील झंवर हा गुन्हा दाखल झाल्यापासून आजपावेतो सुमारे ८ महिने परागंदा झाला होता. कालावधीमध्ये तो दिल्ली, गुजरात व मध्य प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्याच्या परागंदा कालावधीमध्ये त्याने गुन्ह्याशी संबंधित दस्तऐवज, इलेक्ट्रॉनिक पुरावा अन्यत्र कोणाकडे लपवून ठेवला असल्याची दाट शक्यता आहे याबाबत त्याच्याकडे तपास करणे आहे.
२) नमूद कालावधीत झंवरचे वास्तव्याचे ठिकाण नक्की कोठे होते?, तो या कालावधीत कोणाच्या संपर्कात होता?, याबाबत तपास करणे आहे.
३) सुनील झंवरचे राहते घर व कार्यालय झडती पंचनाम्यामध्ये मोठ्या प्रमाणात दस्तऐवज व इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. सर्व दस्तऐवज व इलेक्ट्रॉनिक पुरावे झंवर यास प्रत्यक्ष दाखवून त्याबाबत त्यांच्याकडे सखोल तपास करणे आहे.
४) सुनील झंवर परागंदा कालावधीमध्ये ज्या ठिकाणी वास्तव्यास होता, त्याठिकाणी त्यास आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष नेऊन तसेच जळगाव येथे नेऊन तपास करणे आहे.
५) सुनील झंवर व इतर संशयित आरोपींनी अत्यंत योजनाबद्ध रीतीने कट रचून बीएचआर पतसंस्थेच्या मालमत्तांची कमी किमतीत बनावट लिलाव प्रक्रियेद्वारे विक्री केली आहे. त्यातील मालमत्ता सुनील झंवर आणि सुरज झंवर यांच्या मालकीच्या/ भागीदारीमधील/ कंपन्या फर्मच्या नावे विकत घेतलेल्या आहेत. त्याकरिता पैसा सुनील झंवर यांनीच पुरविल्याचे निष्पन्न झाले आहे. उर्वरित मालमत्ता देखील विकत घेण्याचे सुनील झंवर व सुरज झंवर यांचे नियोजन होते. त्याकरिता त्या दोघांनी त्यांच्याशी संबंधित व्यक्तींना टेंडर भरायला लावून पैसे पुरविले आहेत. याबाबत त्याच्याकडे तपास करणे आहे.
६) सुनील झंवर हा टेंडर मधील मालमत्ता कोणाच्या सांगण्यावरून व कोणाकरिता खरेदी करत होते?, याकरिता आवश्यक असलेला पैसा कसा उपलब्ध केला?, याबाबत अधिक तपास करणे आहे.
७) सुनील झंवर आणि कोठडीत असलेला संशयित आरोपी अवसायक जितेंद्र कंडारे, महाविर जैन व सुरज झंवर यांनी किती कर्जदाराच्या फाईल एफडी वर्ग करून निरंक केल्या आहेत?. अशा कर्जदार व ठेवीदारांबाबत सुनील झंवरकडे तपास करणे आहे.
८) कर्ज निरंक केलेल्या कर्जदार संशयित आरोपींच्या कर्जामध्ये ठेवीदारांची माहिती झंवरच्या कार्यालयातील हार्ड डिस्कमध्ये मिळून आलेली आहे. ही माहिती झंवरकडे कशी आली?, याबाबत सखोल तपास करणे आहे.
९) ठेवी वर्ग करून कर्ज निरंक केलेल्या कर्जदार संशयित आरोपींच्या कर्ज निरंक दाखल्याचे नमुने झंवरच्या कार्यालयातील हार्ड डिस्कमध्ये मिळून आलेले आहेत. ही माहिती सुनील झंवरकडे कशी आली?, याबाबत सखोल तपास करणे आहे.
१०) कर्जामध्ये ठेवी वर्ग करण्याकरिता ठेवी आणून देणाऱ्या एजंटांच्या नावाप्रमाणे ठेवीदारांची यादी सुनील झंवरच्या कार्यालयातून जप्त हार्ड डिक्समध्ये मिळून आली आहे. या एजंटांबाबत सुनील झंवरकडे सखोल तपास करावयाचा आहे.
विजय वाघमारे (9284058683)