जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अपहाराच्या प्रकरणात पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील गुन्ह्यात मुख्य संशयित सुनील झंवरचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अपहाराच्या प्रकरणात पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील गुन्ह्यात मुख्य संशयित सुनील झंवरचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने झंवरचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. दरम्यान, याआधी २० ऑक्टोंबरला डेक्कनच्या गुन्ह्यातही झंवरचा जामीन अर्ज न्यायलयाने फेटाळून लावलेला आहे. तर आता शिक्रापूरच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन फेटाळून लावल्याची माहिती विशेष सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण यांनी दिली आहे. अॅड. चव्हाण यांनी सुनील झंवरच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला होता.
शिक्रापूरच्या फिर्यादीत काय म्हटले होते?
संतोष काशिनाथ कांबळे (वय ५७, रा. लोहगाव, पुणे) यांनी फिर्यादीत म्हटले होते की, ते सुरक्षारक्षकाची नाेकरी करतात तर त्यांचे वडील काशिनाथ भगवान कांबळे हे सन १९९० मध्ये शिक्षक पदावरुन निवृत्त झाले आहेत. दरम्यान, सन २०१४ मध्ये कांबळे कुटंुबियांनी बीएचआर पतसंस्थेच्या संदर्भात आकर्षक व्याज देणारी जाहिरात एका वृत्तपत्रात पाहिली होती. संतोष कांबळे यांचे उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांनी वडीलांसोबत चर्चा करुन जवळ असलेला पैसा बीएचआरमध्ये ठेऊन त्याच्या व्याजावर घरखर्च करण्याची बोलणी केली. त्यानुसार काशिनाथ कांबळे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी या दोघांनी पुण्यातील बीएचआरच्या भिमा कोरेगाव व शिक्रापुर या दोन्ही शाखांमध्ये विविध योजनांतर्गत वर्षभरासाठी पैसे ठेवेल. नंतर पुन्हा मुदत वाढवली. त्यांच्या ठेवींच्या बदल्यात दोन्ही शाखांनी मिळुन १८ लाख ७ हजार १५९ रुपये त्यांना देय होते. परंतू, मुदत संपल्यानंतरही कांबळे यांना पैसे परत मिळाले नाही.
तुम्हाला फक्त २० टक्के रक्कम मिळेल
कांबळे सन २०१५मध्ये दोन्ही शाखांमध्ये गेले असता शाखा बंद पडल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे संतोष कांबळे हे वडीलांसह जळगावातील एमआयडीसी मख्य शाखेत आले. त्या ठीकाणी त्यांना अवसायक जितेंद्र कंडारे भेटला. त्याने सांगितले की, पतसंस्था बुडाली असून आता माझी अवसायक म्हणून नेमणुक करण्यात आली आहे. आम्ही कर्जदारांकडून वसुली करुन ठेवीदारांच्या फक्त १५ ते २० टक्के रक्कम देत आहोत. बाकीची रक्कम बुडणार आहे. आमचे लोक तुमच्या घरी येतील, ते सांगतील तसे करा, १०० रुपयांच्या स्टॅम्पवर ते म्हणतील तसे लिहुन देत सह्या करा. यानंतर तुम्हाला २० टक्के रक्कम मिळेल, असे सांगत कंडारेने कांबळे यांच्या ठेवी, घराचा पत्ता, फोन नंबर लिहुन घेतला.
कंडारेकडून धक्काबुक्की
कांबळे यांनी पुर्ण रक्कम परत मागीतली असता कंडारेने त्यांना शिव्या देऊन बाहेर काढून टाकले. जेवढे भेटतील तेवढे घ्या नाहीतर एक रुपयाही मिळणार नाही असे बोलुन दोघांना धक्काबुक्की करुन बाहेर काढून दिले. यानंतर वेळोवेळी कांबळे हे जळगावात आले परंतू, बीएचआरच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना कंडारेस भेटु दिले नाही. २० टक्के रक्कम घेऊन पावत्या विका, अन्यथा काहीच मिळणार नाही असेच सर्वजण त्यांना सांगत होते. कंडारेसह त्याच्या साथीदारांनी संस्थेच्या मालमत्ता विक्री केली, खोटे कागदपत्र तयार केले, पावत्या २० टक्के रकमेत खरेदी करुन गैरव्यवहार केला आहे.
दलाल नेमल्याची माहिती जळगावातून मिळाली
दलाल नेमुन त्यांच्याकडून राज्यभरातील ठेवीदारांच्या पावत्या २० टक्क्यांनी खरेदी करीत असल्याची माहिती कांबळे यांना जळगावातून मिळाली हाेती. यानंतर सन २०१९ मध्ये कांबळे यांच्या लोहगाव येथील घरी दोन अनोळखी व्यक्ती आले. आम्ही बीएचआर पतसंस्थेचे लोक असून कंडारेंनी पाठवले आहे असा परिचय त्यांनी दिला. यावेळी त्या दोघांनी ३० टक्के रक्कम देण्याचे सांगीतले. परंतू, कांबळे यांनी मान्य केले नाही. दोघांनी कांबळेंना पुन्हा एकदा विचार करा असे सांगत काही ठेवीदारांच्या शपथपत्रांचे नमुने दाखवले. परंतू, पुर्ण रक्कम पाहिजे असल्याने कांबळेंनी दोघांना माघारी पाठवले.
मोठा कर्जदार तुम्हाला पैसे देण्यास तयार
यानंतर संतोष कांबळे यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये परत एकदा जळगाव गाठुन कंडारेला भेटण्याचा प्रयत्न केला. आता वडील मयत झाले आहेत, आता तरी पैसे द्या. अशी विनवणी त्यांनी केली. परंतू, यावेळी देखील त्यांना २० ते ३० टक्के रक्कम परत मिळेल असेच सांगण्यात आले. तसेच तुम्ही जर पावत्या देणार नाही, तर इतर कोणीही देऊ शकेल. कारण आता मोठा कर्जदार तुम्हाला पैसे देण्यास तयार असल्याचे आमीषही दिले होते. परंतू, कांबळे यांनी नकार दिला. अखेर त्यांनी २५ नोव्हेंबर २०२० रोजी शिक्रापुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कंडारेकडून सरकारी पदाचा गैरवापर
बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी प्रकाश वाणी, सुनिल झंवर, महावीर जैन, अजय राठी, विवेक ठाकरे, अजय ललवाणी, उदय कांकरीया व धरम साखला यांच्यावर दाखल झाला गुन्हा झाला होता. दरम्यान, कंडारे याची कर्जदारांकडून वसुली करुन ठेवीदारांचे पैसे परत करण्याची जबाबदारी असताना त्याने सुरेश जैन, राजेश जैन व इतर पदाधिकाऱ्यांमार्फत ठेवीदारांकडे माणसे पाठवून ठेवींच्या पावत्या २०-३० टक्के रकमेत प्रतिज्ञापत्रासह लिहुन घेऊन पुढील तक्रार देऊ नये यासाठी सरकारी पदाचा गैरवापर केला. खोटी कागदपत्रे तयार करुन फायद्यासाठी अपहार, फसवणूक केली, असेही फिर्यादीत म्हटले आहे.
















