जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात मागील ९ महिन्यापासून कारागृहात असलेले विवेक ठाकरे व सुजीत वाणी या दोघांचा जामीन मंगळवारी न्यायालयाने मंजूर केला आहे.
बीएचआर पतसंस्थेत अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्यातील डेक्कन, आळंदी व शिक्रापुर या तीन पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. बीएचआर घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ नोव्हेंबर २०२० रोजी जळगावात छापेमारी केली होती. यावेळी ठाकरे, वाणी यांच्यासह सहा संशयिताना अटक करण्यात आली होती. सुरुवातीच्या दहा दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर सर्वांची न्यायालयात कोठडीत रवानगी करण्यात आली होती. तेव्हापासून संशयित येरवडा कारागृहात बंदी होते. ठाकरे व वाणी यांच्या अर्जावर सुमारे दोन महिने सुनावणी झाली. दरम्यान, अटकेत असलेल्या जितेंद्र कंडारे याने जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. तर मुख्य संशयित सुनील झंवरने तिसऱ्यांदा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या दोघांच्या अर्जावर सुनावणी सुरू आहे.
ठाकरे आणि वाणीवर हे आहेत आरोप
विवेक ठाकरे : हा पावती एजंट तसेच बीएचआरचा मोठा थकबाकीदार आहे. ठाकरे याच्यावर बीएचआरचे अडीच ते तीन कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्ज फेडलेले नसताना त्याने पावती एजंटचे काम केले. ठेवीदारांमध्ये भीती निर्माण करून पावत्या मॅचिंग करून दिल्या. तसेच जेवढे पैसे मिळताय तेवढे घ्या, असा दम भरुन ठेवीदारांना धमकावले.
सुजीत वाणी : दोघे जण पतसंस्थेचे कर्मचारी होती. त्यांच्याकडे अकाउंट हण्डल करण्याची जबाबदारी होती. असे असताना त्यांनी ठेवीदारांची दिशाभूल करून त्यांच्यात भीती पसरवली. खोटे कागदपत्र खरे असल्याचे भासवून ठेवीदारांचे नुकसान तर कर्जदारांचा फायदा करून दिला.
















