जळगाव (प्रतिनिधी) येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह सोसायटीच्या आर्थिक घोटाळ्यात एक नवीन खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यानुसार सुनील झंवर यांचे संबंध नसल्याचे दाखविण्यासाठी सातपूर-अंबडमधील अचानक काही कंपन्यांची मूळ खरेदी कागदपत्रे चोरी झाल्याच्या तक्रारी वाढल्याची चर्चा आहे.
‘बीएचआर’ घोटाळ्यातील प्रमुख संशयित सुनील झंवर यांचे नाशिकमधील बोरा व धान्य व्यापाऱ्यासोबत असलेल्या दुहेरी कनेक्शन असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे सातपूर, अंबडमधील कंपन्यांच्या कागदपत्र गहाळ प्रकरणांशी झंवर यांचे नाव जोडले जात आहे. काही दिवसांपूर्वी सातपूर पोलीस स्थानकात अशाच पद्धतीची एक तक्रार दाखल आहे. कंपन्यांचे खरेदी कागदपत्र गहाळ प्रकरणात कोणचे कनेक्शन आहे, ते तपासले जाण्याची शक्यता आहे. झंवरचे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील भूखंडाचे व्यवहार, कंपन्यांच्या खरेदी प्रकरणानंतर आता गहाळ कागदपत्र प्रकरणाशी नाव जोडले जात आहे. एवढेच नव्हे तर चौकशी प्रकरणात कंपन्यांसोबत इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर, गंगापूर, दरी, मातोरी भागातील फार्महाउसचे व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याची चर्चा आहे. दरम्यान, झंवरसह कंडारेचा पुणे आणि जळगाव पोलिस त्याच शोध घेत आहेत.