भुसावळ (प्रतिनिधी) स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आनंद नगर शाखेत करोडोच्य गृहकर्ज घोटाळ्याची तक्रार करण्यात आली होती. एसबीआयच्या पथकाने आजपासून प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात केली असून चौकशी पथकाने शिरपूर कन्हारा शिवारात जावून पाहणी केली. एवढेच नव्हे तर पथकाने घटनास्थळाची व्हिडीओ शुटींग देखील केली आहे. या ठिकाणी तीन मजली इमारतीच्या ऐवजी रिकामा प्लॉट बघून अधिकारी चांगलेच अवाक् झाले. दरम्यान, एका प्लॉटवर तीन मजली इमारत बांधण्यासाठी प्रत्येकी १८ लाखाचे कर्ज देण्यात आले होते.
शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आनंद नगर शाखेत करोडोचा गृह कर्ज घोटाळ्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत एसबीआयने चौकशीला सुरुवात केल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात एका तक्रारदाराने जून २०२० मध्ये तक्रार केली होती. परंतू पाच महिने होऊन देखील त्यावर कारवाई न झाल्यामुळे तक्रारदाराने २७ ऑक्टोबर रोजी स्टेट बँकेच्या रिजनल मॅनेजर यांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. दरम्यान, जून २०२० मध्ये दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले होते की, भुसावळ येथील जामनेर रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आनंद नगर शाखा प्रबंधक नंदलाल पाटील यांनी पदभार स्विकारल्यापासून भुसावळमधील कुख्यात गुंड प्रवृत्तीच्या हिस्ट्रीशिटर, गुन्हेगार ज्यांनी महात्मा फुले महामंडळ जळगाव, पंजाब नॅशनल बँक शाखा भुसावळ, युनियन बँक शाखा भुसावळ, बँक ऑफ इंडिया शाखा भुसावळ येथे नकली आधारकार्ड, पॅनकार्ड, खऱ्या स्वरूपाचे वाटेल असे बनावट ३ वर्षाचे आय.टी. रिटर्न व बनावटी लाभार्थी तयार करून बँकांना व महामंडळामध्ये करोडा रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्याच लोकांनी शाखा प्रबंधक नंदलाल पाटील यांच्यासोबत संगनमत करून आपला हिस्सा ठरवून बनावट कर्ज प्रकरण पास करत आहेत. तसेच या कर्ज प्रकरणांमध्ये करोडोंचा भ्रष्टाचार करीत आहेत. होमलोनची कर्ज मंजुरी करतांना बोगस लाभार्थी उभे करून फक्त कर्ज घेण्यासाठी अर्जट खाते खोलून बनावट पॅन कार्ड, तीन वर्षांचे आय.टी रिटर्न, बनावट कोटेशन तयार करून कर्ज घेतली आहेत. याप्रकरणातील सर्व बोगस लाभार्थ्यांची पत्त्यांची आणि व्यवसायाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
याबाबत बँकेचे तपास अधिकारी श्री. सोनवणे यांच्यासोबत संपर्क साधला असता यांनी प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात झाली आहे. परंतू चौकशी गोपनीय असल्यामुळे काहीही सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, श्री. सोनवणे यांनी तक्रारदारा सोबत शिरपूर कन्हारा शिवारातील सर्वे क्र.२२/१अ प्लॉट नं. १ याठिकाणी जावून पाहणी केली. स्थानिक तलाठीने चौकशी पथकाला प्लॉट दाखविला. तेथे कमरे एवढे झाडं-झुडपं वाढलेली होती. या ठिकाणी तीन मजली इमारत बांधण्याच्या नावाखाली तीन जणांना प्रत्येकी १८ लाखाचे कर्ज देण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे यातील एका महिलेचा मृत्यू झालेला आहे. चौकशी अहवाल गेल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे.