भुसावळ (प्रतिनिधी) लोहमार्ग भुसावळ पोलिसांनी ३० मे रोजी २९ बालकांची तस्करीच्या संशयावरून सुटका करून बालकल्याण समितीला स्वाधीन केले होते. या मुलांना बिहार येथील बाल समितीच्या ताब्यात देण्याचे आदेश जळगाव जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार मंगळवारी गणवेशधारी पोलिसांसह त्या २९ बालकांची रवानगी बिहारकडे करण्यात आली. बिहारमधील पूर्णिया व अराई जिल्हा बालकल्याण समितीकडे त्यांचा ताबा देण्यात येणार आहे.
दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून मुलांच्या तस्करीबाबतच्या वकिलाच्या वीटनंतर रेल्वे सुरक्षा यंत्रणांनी भुसावळसह मनमाडमध्ये ५९ बालकांची सुटका केली होती. भुसावळात सुटका केलेली मुले जळगाव बालनिरीक्षणगृहात, तर मनमाडमधील मुले नाशिक येथील बाल निरीक्षणगृहात आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिलेल्या आदेशानंतर या मुलांना बिहार येथील महिला दक्षता समितीच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
या २९ मुलांना दोन खासगी टेम्पो ट्रॅव्हलमधून मणियार बिरादरीच्या माध्यमातून साजिद शेख यांच्या सहकार्याने जळगाव येथून भुसावळ रेल्वेस्थानकावर नेण्यात आले. शासनाकडून भुसावळ ते भागलपूर एक्स्प्रेसमध्ये राखीव डबा उपलब्ध करून देण्यात आला. जळगाव जिल्हा मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारूख शेख, जिल्हा अल्पसंख्याक राष्ट्रवादीचे अध्यक्ष मझहर पठाण, शिकलगार फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर खान, ईदगाह ट्रस्टचे सचिव अनिस शहा आदी उपस्थित होते.
















