इंदूर (वृत्तसंस्था) येथील बेलेश्वर मंदिरात रामनवमीचा उत्सव सुरू असताना अचानक विहिरीचं छत कोसळलं. यामुळे २५ ते ३० भाविक या विहिरीत कोसळले आहेत. या ठिकाणी विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत काही जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. (IndoreRam Navami 2023)
स्नेह नगरजवळील पटेल नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिराच्या आवारात बांधलेल्या विहिरीवरील छत कोसळल्याने 25 हून अधिक जण विहिरीत पडले. मंदिरातच एक विहीर आहे, ज्यावर छत होते ते कोसळले. ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी मंदिरात होम-हवन केले जात होते आणि लोक विहिरीवर बसले होते. अचानक वजन वाढल्याने विहिरीचे छत कोसळले. काही समजण्यापूर्वीच लोक खाली पडले. आतापर्यंत चार जणांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर यामध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याचीही शक्यता आहे. दरम्यान, घटनास्थळी रुग्णवाहिकाही पोहोचली आहे. तसेच विहिरीत पडलेल्यांना दोरीच्या साह्याने बाहेर काढण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.