जळगाव (प्रतिनिधी) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी उपनगराध्यक्ष भगवान अमरसिंग पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार रोहित पवार यांचे निकटवर्तीय भूषण पाटील (सायगाव) यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीष महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. नजीकच्या काळात आणखी काही पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या गोटात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपचे जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यामुळे चाळीसगावातही त्यांचे समर्थक अजित पवार गटात सामील होतील, अशी चर्चा सुरू होती. मात्र आमदार मंगेश चव्हाण यांच्या राजकीय डावपेचामुळे शरद पवार गटातील काही महत्त्वाचे पदाधिकारी थेट भाजपच्या वाटेने गेले आहेत.
माजी उपनगराध्यक्ष भगवान पाटील हे माजी आमदार राजीव देशमुख व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यांच्या सोबत त्यांच्या समर्थकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेषतः राजकीय दृष्ट्या प्रभावी समजल्या जाणाऱ्या पिलखोड-सायगाव जि.प. गटाचे माजी सदस्य भूषण काशीनाथ पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यामुळे या भागातील राजकारण नव्या वळणावर येण्याची चिन्हे आहेत.
पिलखोड-सायगाव या राजकीयदृष्ट्या असलेल्या जि.प. गटाचे माजी सदस्य भूषण काशीनाथ पाटील यांनी भाजपत प्रवेश केल्याने या गटातील राजकारण बदलणार आहे.