धरणगाव (प्रतिनिधी) येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित जाहीर सभेत मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले होते. याप्रकरणी युवा सेनेचे महाराष्ट्र प्रचारक शरद कोळी यांच्याविरुद्ध गुरुवारी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाणून घ्या…फिर्यादीत नेमकं काय म्हटलंय ?
प्रभूदास उर्फ बालू रोहीदास जाधव (वय 50 वर्षे, धंदा- मजुरी, रा. लोहारगल्ली, धरणगाव) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, गुलाबराव पाटील साहेब हे आमच्या जळगाव तालुका मतदार संघातून निवडून आले असून ते आता राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आहेत. त्यांचे आई, वडिल व त्यांचा सपुर्ण परिवार गुर्जर समाजाचे सदस्य आहेत. त्यांच्या विषयी माझ्या मनात व हृदयात खूपच आदर आहे. दि. 1 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 8.30 वाजता धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथे श्रीमती सुषमा अंधारे यांच्या महाप्रभोधन यात्रेच्या निमिताने सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सभेत ऐकण्यासाठी मी हजर होतो. सदर सभेमध्ये सुषमा अंधारे यांच्या भाषणाचे अगोदर शरद विठ्ठल कोळी (रा. सोलापूर) यांचे भाषण सुरु असताना त्यांनी आपल्या भाषणात गुर्जर समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. तसेच त्यांची बदनामी केली आहे.
आयोजकांवरही गंभीर आरोप !
शरद कोळी यांनी हेतुपुरस्कर भावना गुर्जर समाजासह इतर समाजच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच भाषण करत असताना आयोजकांपैकी कोणीही त्यांना आवर घातलेला नाही. उलट त्यांना त्यांना प्रोत्साहन देवून आमच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यामुळे या प्रकारात आयोजक देखील तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे विठ्ठल कोळी यांनी गुर्जर समाजाबदली अशी अपशब्द व बदनामीकारक, सामाजीक असंतोष तसेच तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करून गुर्जर जातीतील सर्व स्त्री-पुरुष व लहान पोरांचा अपमान करत जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत द्वेष भावना वाढविण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी १५६ अ, २९५, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.