यावल (प्रतिनिधी) यावल -भुसावळ रस्त्यावर घोडे पीरबाबाच्या दरगाहजवळ गुजरातच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) सुरत येथील एका संशयित ड्रग्स तस्कर तरुणाला पाठलाग करून पकडले. रविवारी सायंकाळी ही कारवाई झाली. मोबीन शाह, असे संशयित आरोपीचे नाव आहे.
गुजरात राज्यातील सूरत येथील संशयित मोबीन हा (जी. जे.०५ आर एम.८४८०) क्रमांकाच्या कारने यावल तालुक्यात आला होता. गुजरातचे एनसीबी पथक सातत्याने त्याच्या मागावर होते. तो यावल भुसावळ रस्त्यावर घोडेपीर बाबा दर्गाजवळ असल्याची कुणकुण लागताच रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता पथकाने त्याला शिताफीने अटक केली. पथकाला पाहून मोबीन शाह याने पलायनचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी पिस्तूल रोखून त्यास सिनेस्टाइल पद्धतीने ताब्यात घेतले. त्याच्यासोबतचे तीन साथीदार मात्र पळ काढण्यात यशस्वी झालेत.
मोबीन शहा याच्याकडून पथकाने एक पिस्तूल व इतर काही वस्तू हस्तगत केल्या. या घटनेची माहिती मिळताच यावलचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, सहायक फौजदार अस्लम खान, हवालदार भूषण चव्हाण, मुस्तफा तडवी यांना घटनास्थळी पाठवले, गुजरातच्या पथकाने संशयित व्यक्ती ड्रग्ज तस्कर असून पसार आहे. मोबीनला गुजरातमधील सुरत येथील दिंडोली पोलिस ठाण्यात नेण्यात आल्याचे कळते. या कारवाईत दिडोली पोलिस ठाण्याचे कुलदीपसिंग हमुभाई दया, दिवेश हरिभाई चौधरी सहभागी होते. कारवाईनंतर मोबीन शहा याला घेऊन पथक गुजरातकडे रवाना झाले. संशयिताची कार घटनास्थळी पडून आहे. याबाबतचे वृत्त आज ‘दिव्य मराठीने दिले आहे.