मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रीय तपास यंत्रणाच्या नावाने वसुलीचे षडम्यंत्र सुरू असल्याचा आरोप भाजपचे आशीष शेलार यांनी विधानसभेत केला. तसेच शासनाने त्याची तातडीने दखल देऊन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. केंद्रीय यंत्रणांच्या नावाखाली राज्यात प्रशासकीय यंत्रणा वसुलीचे षडम्यंत्र रचत असल्याच्या आरोपांची चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील यांनी विधानसभेत केली.
प्राप्तिकर अधिकारी असल्याचे भासवून अंगडीया आणि व्यापाऱ्यांकडून वसुली करीत असल्याचे उघड झाल्यानंतर सरकारने पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना निलंबित केले आहे. भाजपचे आशीष शेलार यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्याच्या माध्यमातून याकडे सरकारचे लक्ष वेधताना सरकारच्या कारवाईचे स्वागत करताना केंद्रीय तपास यंत्रणाच्या नावाने वसुलीचे षडम्यंत्र सुरू असल्याचा आरोप केला. त्रिपाठी यांच्याप्रमाणेच राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अशा प्रकारे केंद्रीय यंत्रणांच्या नावाचा वापर करून वसुली तर करीत नाही ना? केंद्रीय यंत्रणांना बदनाम करण्याचे षडम्यंत्र तर राज्यातील प्रशासकीय यंत्रणेमध्ये शिजत तर नाही ना? त्रिपाठीसारखे अन्य कोणी अधिकारी वसुली तर करीत नाही ना? त्यांच्या पाठिशी कोण उभे आहे, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत़. ही गंभीर बाब असून, शासनाने त्याची तातडीने दखल देऊन चौकशी करावी, अशी मागणी शेलार यांनी केली. त्यावर उत्तर देताना शासन याची गंभीर दखल घेत असून चौकशी केली जाईल, असे वळसे पाटील यांनी सांगितले.