रत्नागिरी (वृत्तसंस्था) शिंदे गटाचे दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam) यांच्या कारला शुक्रवारी रात्री अपघात (Car Accident) झाला होता. मात्र, हा घातपात असल्याचा संशय आमदार कदम यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. धक्कादायक म्हणजे आमदार कदम यांच्या वाहनाला धडक दिल्यानंतर टँकरचालक फरार झाला आहे. त्यामुळे आमदार योगेश कदम यांचे निकटवर्तीय व शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
असा झाला अपघात !
आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले होते. रात्री सव्वादहाच्या सुमारास कशेडी घाटात पोलादपूर नजीक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली. यानंतर टँकर पलटी झाला आणि चालकही पळून गेला. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी पुढे असलेल्या पोलिसांच्या गाडीवर धडकली. यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे.
आई जगदंबेच्या कृपेने आणि आपल्या आशीर्वादाने सुखरूप : आ. कदम !
मुंबईला जात असताना माझ्या गाडीचा अपघात झाला होता. रात्री १०.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. परंतु आई जगदंबेच्या कृपेने आणि आपल्या आशीर्वादाने मी माझे सर्व सहकारी सुखरूप आहेत. आपण कोणीही आमची चिंता करू नका. आज एका मोठ्या अपघातातून आम्ही वाचलो आहे. मला कोणत्याही पद्धतीची दुखापत झालेली नाही. त्यासोबतच माझे पुढील सर्व नियोजित कार्यक्रम नियोजित वेळेवर पार पडणार आहे असं योगेश कदम म्हणाले आहे.
















