भुवनेश्वर (वृत्तसंस्था) ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयने चौकशी केल्यापासून रेल्वेच्या सिग्नल यंत्रणा विभागातील सोरो सेक्शन सिग्नल जुनियर इंजीनियअर कुटुंबासह बेपत्ता असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. सीबीआयने इंजीनियरचं घर सील केलं आहे.
ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघाताला सिग्नल यंत्रणेतील दोष कारणीभूत ठरल्याची चर्चा सुरू असतानाच आता सीबीआयने सोमवारी (१९ जून) रेल्वेच्या सिग्नल यंत्रणा विभागातील सोरो सेक्शन सिग्नल जुनियर इंजीनियरचं घर सील केलं आहे. बालासोरमध्ये भाड्याच्या घरात राहणारा हा इंजीनियर सीबीआय चौकशीनंतर कुटुंबासह बेपत्ता आहे.
सिग्नलच्या ज्युनिअर इंजिनिअरची पहिल्यांदा चौकशी करण्यात आली होती. तेव्हापासून तो बेपत्ता आहे. सीबीआयने १६ जूनला बालासोर सोडले होते, यानंतर ते अचानक सोमवारी आले आणि ज्युनिअर इंजिनिअरचे घर सील केले. सीबीआयने ६ जून रोजी बालासोर रेल्वे अपघाताच्या प्रकरणाचा तपास आपल्याकडे घेतला.
या प्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आली आहे. सीबीआयने अपघाताची चौकशी हाती घेतली तेव्हापासून बालासोर स्टेशन सील करण्यात आले असून चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या स्टेशनवर एकही ट्रेन थांबणार नाहीय. दरम्यान, सिग्नल जुनियर इंजीनियअर आणि त्याचे कुटुंबीय बेपत्ता असल्याने संशयाची सुई त्याच्याकडे वळली आहे. दुसरीकडे या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या आता २९२ वर पोहचली आहे.