मुंबई (वृत्तसंस्था) दिशा सालीयन प्रकरणावरून भाजप नेते नितेश राणे यांनी आज विधानसभेत अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच, या प्रकरणाच्या एका प्रत्यक्षदर्शीचा व्हिडिओही आपल्याकडे असल्याचा दावा नितेश राणे यांनी पेन ड्राईव्ह दाखवत केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
आज विधानसभेत नितेश राणे म्हणाले, दिशा सालीनयने आत्महत्या केली नसून तिची हत्याच झाली आहे. याप्रकरणात राज्यातील एक नेताही सहभागी आहे. दिशाने आत्महत्या केली असेल तर ती राहत असलेल्या घराचे त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज, व्हिजिटर पेज का गायब आहेत, तेथील वॉचमनचा अजूनही शोध का लागलेला नाही? असे प्रश्न राणे यांनी उपस्थित केले.
दिशा सालीयन हत्येच्या प्रत्यक्षदर्शीचा व्हिडिओ आपल्याकडे
ज्या व्यक्तीसोबत दिशा राहत होती, ती व्यक्ती तर या घटनेची प्रत्यक्षदर्शी आहे. ती व्यक्ती अजूनही का गायब आहे?, असा सवालही नितेश राणे यांनी केला. दिशा सालीयन हत्येच्या प्रत्यक्षदर्शीचा व्हिडिओ आपल्याकडे आहे. यामध्ये तो जे काही घडले ते सांगताना दिसत आहे, असा दावा नितेश राणे यांनी केला व तो व्हिडिओ असलेला पेन ड्राईव्ह सभागृहाला दाखवला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बनंतर आज पुन्हा एक पेन ड्राईव्ह दाखविण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली.
राजकीय व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न
राणे पुढे म्हणाले की, आपल्याकडे हा पुरावा फार पुर्वीपासून आहे. मात्र, आपण तो जाणूनबुजून मुंबई पोलिसांना दिला नाही. कारण मुंबई पोलिसांवर आपला विश्वास नाही. मुंबई पोलिस सुरूवातीपासून याप्रकरणाचा चुकीच्या पद्धतीने तपास करत आहे. दिशा सालीयनला न्याय देण्याऐवजी एका राजकीय व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे हा पेन ड्राईव्ह आपण मुंबई पोलिसांना देणार नाही. तसेच, विधानसभा सभापतींकडेही हा पेनड्राईव्ह सुपूर्द करणार नाही. कारण या प्रकरणात सहभागी असलेल्या नेत्याला वाचवण्यासाठी सरकार काहीही करू शकते.
…तर प्रत्यक्षदर्शी तो जिवंतही राहणार नाही
प्रत्यक्षदर्शीबाबत माहिती समोर आल्यास तो जिवंतही राहणार नाही. पेनड्राइव्हचा जमाना आहे, म्हणून या प्रकरणी संवादाचा पेनड्राइव्ह आहे. या दिशा सालियन प्रकरणात राज्यातील एक मंत्री सहभागी असल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केलाय. हा पेनड्राइव्हचा पुरावा लवकरच कोर्टाच्या माध्यमातून सीबीआयकडे देणार असल्याचेही ते म्हणाले.