बिहार (वृत्तसंस्था) बिहारचे शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही वेळातच गुरुवारी राजीनामा दिला. विरोधी पक्षांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. पत्नीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात त्यांच्या कथित सहभागाची चौकशी करण्याची मागणी केली जात होती.
दरम्यान, बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता स्थापन होताना चौधरी यांना मंत्रिपद दिले जाणार असल्याचे स्पष्ट होताच केवळ सध्याचे विरोधी पक्षच नव्हे, तर काही स्वकीयांमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. तरीही त्यांना राज्याच्या शिक्षणमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, याचा अधिकच बोभाटा होत असल्याचे पाहून सरकारची बदनामी टाळण्यासाठी अखेर चौधरी यांना राजीनामा द्यावा लागला. राष्ट्रीय जनता दलाने गेल्या २ दिवसांपासून मेवालाल चौधरी यांच्याविरोधात आघाडी उघडली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी त्वरित सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना टोमणा मारताना लिहिले, ‘मी म्हटले होते ना, आपण थकला आहात. त्यामुळे आपली विचार करण्याची-समजून घेण्याची शक्ती क्षीण झाली आहे. जाणूनबुजून भ्रष्टाचारी व्यक्तीला मंत्री बनवले. टीका होऊनही पदभार स्वीकारायला लावला आणि काही तासांनीच राजीनाम्याचे नाटक रचले. खरे गुन्हेगार आपणच आहात. आपण चौधरींना मंत्री का केले? आपला दुटप्पीपणा आणि नौटंकी यापुढे चालू दिली जाणार नाही.