सातारा (वृत्तसंस्था) औंध ता. खटाव नजीक घाटमाथा परिसरात घाट चढून वर येत असणाऱ्या टीव्हीएस एक्सेल (क्र. एम.एच. ११ डी.जे. ७८२८) या दुचाकीला रहिमतपुरकडे जाणाऱ्या (एम एच. ११ ए.एल. ६१२० ) या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मोटारसायकल चालक ज्ञानदेव निवृत्ती घोरपडे ( वय अंदाजे ६२, रा. निसराळे, ता. सातारा) हे जागीच ठार झाले. तर दुसरा गंभीररित्या जखमी झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी सायंकाळी साडेचारच्या सुमारास रहिमतपूरकडे जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेत दुचाकी चालक ज्ञानदेव निवृत्ती घोरपडे हे जागीच ठार झाले. दुचाकीवर त्यांच्यासोबत असणारे दत्तात्रय अंतू चव्हाण, रा. किरोली वाठार (वय ५५) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. परंतु रहिमतपुरकडून औंधला येणाऱ्या शशांक पाटील, रा. खरशिंगे, ता. खटाव यांच्या स्विफ्ट डिझाइर (एम. एच. ११ सी. क्यू. ३०३५) या चारचाकी वाहनाला देखील त्याने घाटाच्या शेवटच्या वळणावर जोरदार धडक दिली.
या अपघातामध्ये शशांक पाटील यांना कोणतीही दुखापत झाली नव्हती. संशयित ट्रकचालकाला पोलिसांनी त्वरीत पाठलाग करून पकडले असून आरोपीने मद्यप्राशन केले असल्याची शंका असल्याने त्याला वैद्यकीय तपासणीसाठी औंध शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेची औंध पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे.
 
	    	
 
















