जळगाव (प्रतिनिधी) गुजरातसह राज्यभरातील विविध शहरातून ऑटो रिक्षा व दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या ६ ऑटो रिक्षांसह १४ महागड्या दुचाकी जप्त करण्यात आले आहे.
जळगाव शहरातून चोरी झालेली दुचाकी धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील तरुण वापरत असून होता. ती दुचाकी तो पंधरा हजारात विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे पथकातील कर्मचारी प्रवीण भालेराव यांना मिळाली. त्यांनी दुचाकी विक्री करणाऱ्या आमीन कालु मणियार (वय ३९, रा. रंगारी मोहल्ला पाळधी, ता. धरणगाव) याला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्याने साथीदार मुस्ताकीन अजीज पटेल (वय २८, रा. पाळधी, ता. धरणगाव) व जाबीर सलमान शेख (वय २७, रा. पाळधी, ता. धरणगाव) यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. पथकाने मुस्तकीन आणि अमीन यांना पाळधी गावातून तर जबिर याला मालेगाव येथून अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी १४ दुचाकींसह ६ ऑटो रिक्षा काढून दिल्या.
चोरट्यांनी गुजरातमधील करडोलीसह जळगाव, मालेगाव, छत्रपती संभाजी नगर, खारघर नवी मुंबई, जूहू मुंबई याठिकणाहून दुचाकी व ऑटो रिक्षा चोरी केल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, एलसीबीचे पोनि. बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, श्रीकृष्ण पटवर्धन, पोहकॉ संघपाल तायडे, मुुरलीधर धनगर, पोना प्रवीण भालेराव, सागर पाटील, संदीप पाटील, जयवंत चौधरी, प्रदीप चवरे, ईश्र्वर पाटील, लोकेश माळी, दीपक चौधरी, भारत पाटील यांच्या पथकाने केली.