अहमदनगर (वृत्तसंस्था) संभाव्य बदनामीच्या भीतीपोटी भाजपने महापालिकेच्या पोटनिवडणुकीत चक्क उमेदवारच बदलल्याची चर्चा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक उद्गार काढल्याप्रकरणी नगर महापालिकेतील श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. त्यासाठी पोटनिवडणूक होत आहे. या एका जागेसाठी तब्बल १३ जण रिंगणात उतरले आहेत.
छिंदमचे पद रद्द झाल्यानंतर या प्रभागात काय होते, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. या प्रभागासाठी अर्ज दाखल करण्याची सोमवारी अखेरची मुदत होती. यावेळी १३ जणांनी अर्ज दाखल केले. १२ डिसेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे. छिंदम किंवा त्यांचे कुटुंबीयही या निवडणुकीपासून दूरच राहिले आहेत. यामध्ये मोठी चर्चा झाली ती भाजपला ऐनवेळी उमेदवार बदलावा लागण्याची. त्याचे कारण आधी गैरसमज व नंतर बदनामीची भीती असल्याचे सांगितले जाते. भाजपकडून प्रदीप परदेशी व अभिजीत चिप्पा हे दोघे इच्छुक होते. याशिवाय प्रताप परदेशी नावाच्या आणखी एकानेही कोरा अर्ज नेला होता. त्यात प्रताप परदेशी यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितल्याची चर्चा शहरभर होती. मात्र, भाजपच्या पदाधिकार्यांनी हे परदेशी आपलाचे असल्याचा समज करून घेतला. त्यामुळे त्यांनी अभिजीत चिप्पा यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली. एबी फॉर्मही त्यांना दिला. त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला. मधल्या काळात काळात चिप्पा हे शिवद्रोही छिंदमशी संबंधित असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावरून काही शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त करीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे संपर्कही साधला. त्यामुळे भाजपच्या गोटात चलबिचल सुरू झाली. टीका होईल, या भीतीने उमेदवार बदलण्याचा निर्णय झाला. पक्षाचे प्रमुख पदाधिकारी तातडीने निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात गेले. तोपर्यंत पक्षाचे दुसरे इच्छुक प्रदीप परदेशी यांनीही राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी जाणारा तो परदेशी मी नव्हेच, असे स्पष्टीकरण भाजपच्या स्थानिक नेत्यांना दिले. त्यामुळे लगेच त्यांच्या नावाचा स्वतंत्र एबी फॉर्म तयार केला गेला. दुसरीकडे काहींनी चिप्पा यांना भेटून गैरसमजाबद्दल त्यांचीही समजूत काढली. शेवटच्या क्षणी चिप्पा यांना देण्यात आलेली पक्षाची उमेदवारी रद्द करून ती परदेशी यांना देण्यात आली.