नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेश येथील लखीमपूर खीरी येथे भाजप आमदाराच्या (MLA) गाडीने दोन भावांना चिरडले आहे. या अपघातामध्ये (Accident) दुचाकीवरील दोन्ही भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघात केलेली कार आमदाराची असल्याचे सांगितले जात आहे. कार आणि चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मृत लखीमपूर खेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किरतपूर या गावचे रहिवासी आहेत. रामापूर येथून घरी परतत असताना हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्कॉर्पिओ कार आणि चालकाला ताब्यात घेतले आहे. योगेश वर्मा यांची पत्नी नीलम वर्मा यांच्या नावावर कारची नोंदणी असल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघाताच्या वेळी आमदार गाडीत नव्हते असे सांगण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अरुण सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार की, लखीमपूर- बहराइच रस्त्यावर रामापूरजवळ दुचाकी आणि स्कॉर्पिओ यांच्यात झालेल्या धडकेमध्ये २ तरुणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी आढळलेली स्कॉर्पिओ गाडी भाजप आमदार योगेश वर्मा यांची आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.