खंडवा (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशच्या खंडवाचे भाजप खासदार नंदकुमार सिंह चौहान यांचे मंगळवारी निधन झाले. कोरोना संक्रमित झाल्यानंतर ५ फेब्रुवारीला त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नंदकुमार सिंह चौहान यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीतील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. नंदकुमार सिंह चौहान हे खंडवा मतदारसंघाचे भाजपचे खासदार होते. नंदकुमार सिंह चौहान यांनी सहावेळा खासदार म्हणून लोकसभेत निवडून आले होते. तर दोन वेळा त्यांनी आमदारकीही भुषवली आहे. तसंच चौहान सरकारमध्ये ते मंत्री सुद्धा राहिले होते. त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्षपद सुद्धा भुषवले होते. नंदकुमार सिंह चौहान यांच्या निधनामुळे भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
भाजप खासदार यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, ‘खंडवा येथील लोकसभा खासदार नंदकुमार सिंह चौहान यांच्या निधनाने दुःखी आहे. त्यांना मध्य प्रदेशात भाजपला मजबूत करण्याच्या संघटन कौशल्य आणि आणि त्यांच्या प्रयत्नांसाठी स्मरणात ठेवले जाईल. त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना’