कोलकाता (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागलेल्या भाजपा युवा मोर्चाच्या महिला नेत्याकडे अमली पदार्थ सापडल्याने खळबळ उडाली आहे. या महिला नेत्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी भाजपाच्या माहिला नेत्याला १०० ग्राम कोकीनसहीत अटक केली आहे.
भाजपाच्या या महिला नेत्याचे नाव पामेला गोस्वामी असं आहे. पामेला गोस्वामीसोबतच तिचा सहकारी प्रबीर डे यालाही अटक करण्यात आलीय. दोघे बऱ्याच काळापासून अमली पदार्थांच्या ड्रग्स विक्री व्यवसायामध्ये सामील असल्याचे कोलकत्ता पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १९ फेब्रुवारीला पामेला गोस्वामी कोकीन घेऊन आपल्या कारमधून जात असतानाच पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडलं. पोलिसांनी तिला कोकीन पुरवणाऱ्या प्रबीर डे यालाही अटक केलीय. ज्यावेळी त्यांना अटक केली, त्यावेळी सुरक्षा रक्षक त्यांच्या गाडीमध्ये होता. पोलिसांच्या ८ गाड्यांनी त्यांचा पाठलाग करून पामेलाची गाडी अडवली होती. त्यानंतर त्यांची गाडी थांबवून विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडविचे उत्तरे दिली. यामुळे पोलिसांचा संशय अजूनच बळावला. पोलिसांनी चेकिंगसाठी न्यू अलीपुर येथे रोडवरच पामेला यांची गाडी अडवून गाडी तपासली. यानंतर त्यांच्या बॅगमध्ये आणि कारमध्ये १०० ग्रॅम कोकेन सापडले.
अमली पदार्थांच्या सध्याच्या किंमतीनुसार जप्त करण्यात आलेले कोकीन हे पाच लाख रुपयांचे आहे. पोलीस सध्या पामेलाची चौकशी करत आहे. पोलीस पामेलाला आज न्यायालयासमोर हजर करणार आहे. त्यानंतर पोलीस पामेलाच्या कोठडीसाठी मागणी करणार असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. अमली पदार्थांच्या या रॅकेटमध्ये नक्की कोणकोणते लोकं आहेत हे जाणून घेण्याच्या दृष्टीने पोलीस तपास करणार आहेत.
















