जळगाव (प्रतिनिधी) अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र त्यांना अद्यापही भरपाई मिळालेली नाही. हा प्रश्न घेवून भाजपने राज्य शासनाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढला. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे ठाकरे सरकार नालायक सरकार आहे. असे नालायक सरकार असणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याची घणाघाती टीका भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात ठाकरे सरकारच्या विरोधात आज दुपारी जळगावात भाजपच्यावतीने शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. भाजप नेते गिरीश महाजन यांनी या मोर्चाचे नेतृत्त्व केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर तेथे जाहीर सभा झाली. या सभेत ठाकरे सरकारला लक्ष्य करताना गिरीश महाजन बोलत होते. शेतकऱ्यांचे कापण्यात आलेले वीज कनेक्शन तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने भाजपच्या नेत्यांनी ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले. शहरातील शिवतीर्थ मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.
भाजप नेते गिरीश महाजन पुढे म्हणाले की, यावर्षी शेतकरी अतिवृष्टीमुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे झाले म्हणजे नुसते कागद काळे झाले. मंत्री आले, शेतीतील नुकसान पाहून गेले. शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासने मिळाली. पण एक दमडीचीही मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. हे सरकार नुसती आपली पाठ थोपटून घेत आहे. आमचे सरकार एक नंबर, आमचे मुख्यमंत्री एक नंबर म्हणवून घेत आहेत. मात्र, प्रत्यक्षात हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. आज शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी तसेच व्यापारी असे सर्वच घटक सरकारवर नाराज आहेत. हे सरकार लायक नाही तर नालायक सरकार आहे, अशी टीका करत गिरीश महाजन यांनी ठाकरे सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. आठवडाभरात शेतकऱ्यांना मदत केली नाही तर आम्ही बैलगाडी, ट्रॅक्टरसह रस्त्यावर उतरू, असेही त्यांनी सांगितले.
मोर्चात भाजपचे खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, संजय सावकारे, चंदू पटेल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी आदींसह जिल्हाभरातील भाजपचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.