जळगाव (प्रतिनिधी) भाजपच्यावतीने आज शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी ट्रॅक्टरवर नेत्यांची भाषण सुरू असतानाच जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांना भोवळ आली. त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेवेळी हा प्रकार घडला.
मोर्चात सहभागी झालेली भाजपची नेतेमंडळी एका ट्रॅक्टरवर उभे राहून मोर्चात सहभागी शेतकरी व कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. याचवेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील या देखील नेत्यांसोबत ट्रॅक्टरवर उभ्या होत्या. भाजप नेते गिरीश महाजन यांचे भाषण सुरू असताना रंजना पाटील अचानक भोवळ येऊन ट्रॅक्टरवरच खाली कोसळल्या. त्यावेळी खासदार रक्षा खडसे व इतर महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांना सावरले. मात्र, अस्वस्थ वाटत असल्याने रंजना पाटील यांना तातडीने चारचाकीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे भाजप नेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. रंजना पाटील यांच्याप्रमाणेच एका भाजपा कार्यकर्त्याला देखील अशाच प्रकारे गर्दीत भोवळ आली होती.