बोदवड ( प्रतिनिधी ) समाजामध्ये अजूनही नेत्रदानाबद्दल पुरेशी जागरूकता नाही, तेव्हा तुम्ही युवकांनी मनावर घेतले तर नक्कीच समाजात सकारात्मक बदल घडेल आणि अंधव्यक्तींना नेत्रदानामार्फत निसर्गाचा आनंद घेता येईल, असे प्रतिपादन आज डॉ. नितु पाटील यांनी बोदवड याठिकाणी केले.
परमवीर चक्र विजेता कॅप्टन विक्रम बत्रा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोदवड या ठिकाणी नेत्रदान आणि त्याचे महत्त्व याविषयी चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी वासुदेव नेत्रालय वरणगावचे संचालक डॉ. नितु पाटील यांनी विविध बाबींवर प्रकाश टाकला. नेत्रदान म्हणजे काय?, नेत्रदान कोण करू शकतो?, कोण नाही?, शासकीय अटी नियम?, नेत्रदानाची प्रक्रिया? आदी विषयी सविस्तर माहिती उपस्थित विद्यार्थी मित्रांना देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे देखील देण्यात आली. अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये हे चर्चासत्र आटोपले.
यावेळी गटनिर्देशक अनिल कोल्हे, विजेंद्र कोळेकर, शिल्पनिर्देशक गिरीश राणे, विजय सोनवणे, सागर वाघ, दीपक चौधरी, संतोष आमोदेकर , प्रनोती चव्हाण, पूजा डोंगरे, व्ही. पी. भालेराव, चरणजीत उज्जेनवाल आदी उपस्थित होते. यावेळी अनिल कोल्हे यांनी प्रस्तावना तर विजेंद्र कोळेकर यांनी आभार प्रदर्शन केले.