बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील करंजी पाचदेवळीचे सरपंच जानकीराम देवराम शिंबरे (पाटील) यांना शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यामुळे अपात्र घोषीत करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेश पारित केले आहेत.
करंजी पाचदेवळी सरपंच जानकीराम शिंबरे (पाटील) यांनी शासकीय जागा गट क्र.१२१/२ वरील मिळकत क्र.11 वर अतिक्रमण केले असल्याचा अर्ज अनिल गंभीर मोरे रा. करंजी पाचदेवळी यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार केली होती त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. जळगांव यांचा अहवाल मागवला असता त्यात सरपंच पाटील यांनी सदर गट क्रमांकात पक्के बांधकाम केलेले आहे. हे अतिक्रमण नियामानुकूल करण्यात आलेले नाही. त्यामुळे सरपंच हे अतिक्रमात जागेत रहात असल्याचा निष्कर्ष निघत असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ११४ ज-३ प्रमाणे नियमाचे उल्लंघन झालेले आहे असे नमूद केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी सरपंच पाटील यांना अपात्र घोषित करण्याचा आदेश २६ ऑगस्ट २२ रोजी पारित केला असून हा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. जळगाव, तहसिलदार बोदवड ,गटविकास अधिकारी पं. स.बोदवड यांना कळवण्यात आला आहे.