बोदवड (प्रतिनिधी) नगरपंचायत कडून विशेष सभेचे इतिवृत्त दिले जात नसल्याने विरोधीपक्ष गटनेते जफर शेख यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मागील २३आँगस्ट रोजी नगरपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलवण्यात आली होती. या विशेष सभेत एकुण ९ विषय मांडण्यात आले होते या सभेचे इतिवृत्त मिळण्यासाठी विरोधी गटनेते जफर शेख यांनी दि. ३० सप्टेंबर रोजी मागणीचे लेखी पत्र नगरपंचायत प्रशासनाकडे सादर केले होते.
जफर शेख मागणी करूनही इतिवृत्त न मिळाल्याने २२ आँगस्ट रोजी स्मरण पत्र देऊन माहीती न मिळाल्यास दि.२६ पासून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला होता. तरीदेखील इतिवृत्त न मिळाल्याने जफर शेख यांनी आज उपोषण सुरू केले आहे. नगरपंचायत प्रशासनाने सभा लिपीक विजय अग्रवाल यांनी सदर सभेचे इतिवृत्त लिहुन प्रोसिडीग बुक नगराध्यक्ष महोदयांकडे तपासणी साठी ८ दिवसापासून घरी देण्यात आले आहे, असे पत्र विरोधी गटनेते शेख यांना दिले आहे.
यावर विरोधी गटनेते जफर शेख यांनी कोणत्या अधिकाराने बुक घरी ठेवून घेतले?, असा प्रश्न उपस्थित केला आणि सत्ताधारी नगराध्यक्ष आनंदा पाटील व मुख्याधिकारी गजानन तायडे हे संगनमताने अनागोंदी कारभार करत असुन यामुळे शहरवासीयांच्या मुलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे, असाही आरोप केला.
तसेच जनतेकडून पाणी पट्टीवर २४ टक्के व्याजदर घेण्यात येत आहे, दिवाबत्ती बाबत नियोजन नसल्याने नागरिकांना अडचण होते,मोकाट गुरांचा आणि कुत्र्यांचा विषय दुर्लक्षित केला जात आहे, घरकुल चे हप्ते मिळत नाहीत, नियमित फवारणी होत नाही, टीसीएल पावडरचे बिल बेहिशोबी काढले जाते, नफा फंडातले पैशांचा गैर वापर होत आहे, विरोधक नगरसेवक यांच्या वार्डात अडीच वर्षात कोणत्याही प्रकारचा विकास काम न करणे, असा अनागोंदी कारभार होत असल्याचा आरोप केला.
सत्ताधारी हे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या दबावात कारभार करत असल्याचे गटनेते जफर शेख यांनी सांगितले. यावेळी उपोषण स्थळी उपस्थित नगरसेवक भरत आप्पा पाटील लतिफ शेख मुजमिल शहा ,दिपक झांबड ,नगरसेविका योगिता खेवलकर यासह कैलास चौधरी,गोपाल गंगतिरे,हकीम बागवान,पदाधिकारी व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते हजर होते.