यावल (प्रतिनिधी) शहरात गेल्या १० वर्षापासून औषधोपचाराच्या नावाखाली रूग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या पश्चिम बंगालमधील (कोलकाता) येथील बंगाली बिजनकुमार राय नावाच्या बोगस डॉक्टरवर येथील तालुका आरोग्य विभागाने कारवाई केली. या बोगस डॉक्टरविरूद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे.
येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी यांच्याकडे यावल येथील तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रमेश पाचपोळे यांनी दिलेल्या माहितीवरून यावल शहरातील नगर परिषदेच्या व्यापारी संकुलात बंगाली नावाने ओळखला जाणारा व हल्ली धनगरवाडा येथे राहणाऱ्या बिजन निमलचंद राय याच्यावर कारवाई करण्यात आली.
राय हा डॉक्टर असल्याचे भासवून ग्रामीण भागातील रूग्णांवर उपचार करत होता. तक्रारीवरून यावल पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू याकुब तडवी यांच्या मार्गदर्शनात डी. सी. पाटील व तक्रारकर्ते तथा यावल तालुका मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनात बोगस बंगाली डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टरचे उपचाराचे साहित्य जप्त करुन त्याच्या विरूद्ध विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.